नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यात लवकरच ओबीसी जोडो यात्रा काढण्यात येणार असून ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्टय ठेवून ओबीसी सेल विभागातील पदाधिकाऱ्यांनी छोट्या छोट्या समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामावून घ्यावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी झोकून द्यावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी ओबीसी पदाधिकारी संपर्क अभियान बैठकीत केले.
शहाद्यातील महाकाल लॉन्स मधे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यां बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र वाघ,राज्य चिटणीस निलेश चौधरी, चिटणीस रवींद्र पाटील,धुळे जिल्हा ओबीसी जिल्हाध्यक्ष ईश्वर माळी, जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा,शहादा तालुका अध्यक्ष पुष्पक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्याणराव आखाडे म्हणाले, 15 फेब्रुवारी ते 27 मार्च यां चाळीस दिवसात चांदा ते बांधा पर्यंत ओबीसी समाजात जाऊन संवाद साधायचा आहे. राज्यात ओबीसी समाज हा पन्नास टक्क्याहुन अधिक आहे. यां समाजातील तरुणांना पक्षात सामावून घ्या. येत्या काही दिवसात ओबीसी जोडो यात्रा काढण्यात येणार आहे. जिल्हयात पक्ष मजबूत झाल्यास आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळू शकेल. ऍड सचिन औटी म्हणाले, विविध जाती, घटकांना ओबीसी सेल मधे संधी दया. तालुका स्तरावर पक्ष मजबूत करा. ज्या कार्यकर्त्यांचे काम चांगले असेल त्यांना मुंबईत सन्मानित करण्यात येईल.
डॉ अभिजित मोरे म्हणाले, ओबीसी सेल विभाग सुरु होण्यास तीन आठवडे झाले. धडगाव वगळता ओबीसी सेलच्या 5 तालुकाध्यक्ष पदाची नियुक्ती झाली आहे. पक्ष संघटन मजबुतीवर भर देण्यात येत असून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठे यश मिळणार आहे. बैठकीचे प्रास्ताविक ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर यांनी सूत्रसंचालन रणजित राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन सीताराम पावरा यांनी केले. राहुल बोरदे, राजेंद्र पाटील, कैलास पाटील,धनराज बच्छाव, सुरेंद्र कुंवर आदींनी परिश्रम घेतले.