नंदुरबार l प्रतिनिधी-
राजकीय वाटचाल करताना आपण सदोदित वंचित घटकांपर्यंत योजना पोहोचवण्याला प्राधान्य दिले गावागावात विकास घडवण्याचा प्रयत्न केला. ते करत असताना कामगार शेतकरी गरीब वंचित ग्रामस्थ आणि बेघर लोकांना सरकारी योजनांचा लाभ देऊन स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न केला. मी मंत्री असताना किंवा डॉ. हिना गावित खासदार असताना नंदुरबार जिल्ह्यात घरकुल योजनेची काटेकोर अंमलबजावणी करवून घेतली तेव्हा आमचा तोच उद्देश होता. जिल्ह्यातील लाखो बेघरांना घरकुल मिळवून देऊ शकलो याचे त्यामुळे आम्हाला समाधान वाटते. कोणताही बेघर व्यक्ती घरकुल योजने पासून वंचित राहणार नाही यासाठी आम्ही यापुढेही दक्ष राहू; असे सांगतानाच महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आता आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अधिकाऱ्यांना वेळच्या वेळी पूर्तता करून लाभार्थ्यांना न्याय देण्याच्या सूचना दिल्या.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत नंदुरबार पंचायत समिती सभागृहात माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबार तालुक्यातील लाभार्थ्यांना घरकुलाच्या हप्त्याचे व निवडपत्रांचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणातून घरकुल बांधकामाबाबत आणि मनरेगा अंतर्गत मिळणाऱ्या लाभाबाबत व शौचालयाबाबत उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच संसद रत्न मा खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रयत्नांमुळे वंचित राहिलेल्या बेघरांचा सर्वे झाला आणि सुमारे 85 हजार घरकुल ‘ड’ यादीतून मंजूर होऊ शकले अशी माहिती देखील डॉक्टर गावित यांनी दिली.
नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड, सहाय्यक गटविकास अधिकारी आर के बिऱ्हाडे, तालुकाध्यक्ष भाजपा जितेंद्र पाटील यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच दीपक पाटील, विनोद वानखेडे, मुन्ना पाटील, जगदीश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.