नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा नगरपालिकेवर प्रशासक राज असून शहरातील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. याबाबत संतप्त शहरवासी यांनी विविध भागातील समस्यांचे फोटो काढून त्याचे बॅनर बनवत मुख्य चौकात लावत संताप व्यक्त केला. मात्र प्रशासनाने समस्यांवर उपाय शोधण्याऐवजी ते बॅनर अनधिकृत असल्याचे सांगत अनधिकृत बॅनर लावण्याच्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा शहरातील विविध प्रभागांमध्ये अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी शहरातील नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले. मात्र त्यावर उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एकत्र येत शहरातील विविध भागातील फोटो काढून त्याचे बॅनर बनवले व शहरातील मुख्य चौकात लावले.
निवेदनानंतर प्रशासनावर कुठलाच परिणाम झाला नाही. मात्र या समस्या निदर्शनास आणल्यानंतर प्रशासनाला जाग येईल असे वाटत असताना. तळोदा पालिकेच्या प्रशासनाने वेगळीच भूमिका घेतली. तळोदा नगर परिषदेच्या अनधिकृत बॅनर अंमलबजावणी समितीचे नोडल अधिकारी दिपक शिवाजी पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जानेवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता स्मारक चौकाजवळ आंबेडकर नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका इमारतीवर अनधिकृतपणे बॅनर लावण्यात आला होता.
बॅनरवर “प्रशासक नंतर तळोदा शहराची अवस्था” असा मजकूर लिहिण्यात आला होता. या प्रकरणात नगर परिषदेची कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे बॅनर लावणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा पोलीस ठाण्याने या प्रकरणी तपास सुरू केला असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. नगर परिषदेनेही अनधिकृत बॅनरविरोधी मोहिम तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.