नंदुरबार l प्रतिनिधी-
राष्ट्रभक्तीचे स्फूर्ल्लिंग वंदे मातरम या गीताने होते, वंदे मातरम हे राष्ट्रगान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला म्हणता येणे आणि त्याचा अर्थ कळणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम हे राष्ट्रगान शाळा- महाविद्यालय, शैक्षणिक संस्था याठिकाणी दररोज राष्ट्र गीता सोबत तर शासकीय- निम शासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, महाराष्ट्र दिनी यादिवशी गाणे अनिवार्य करावे अश्या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत तर आमदार डॉ विजयकुमार गावित यांना समक्ष भेटून दिले.
यावेळी आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत बंधनकारक होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
निवेदनात म्हटले आहे की, इ.स.१८७० मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले. १८९६ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम राजकीय संदर्भात गायलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारक हे वंदे मातरमचा घोषणा देत हुतात्मा झाले. २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने “वंदे मातरम” हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले.याप्रसंगी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाले की, ” जन गण मन ” या भारताच्या राष्ट्रगीताच्या बरोबरीने या गाण्याचा देखील सन्मान केला पाहिजे.
आजही राष्ट्रभक्तीचे स्फूर्ल्लिंग वंदे मातरम या गीताने होते, वंदे मातरम हे राष्ट्रगान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला म्हणता येणे आणि त्याचा अर्थ कळणे गरजेचे आहे यासाठी ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गान शाळा, महाविद्यालयात, शासकीय- निमशासकीय कार्यालये यांना बंधनकारक करावे अशी जनभावना आहे, जनभावनेचा आदर राखत महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम हे राष्ट्रगान शाळा- महाविद्यालय, शैक्षणिक संस्था याठिकाणी दररोज राष्ट्र गीता सोबत तर शासकीय- निम शासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, महाराष्ट्र दिनी यादिवशी गाणे अनिवार्य करावे असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, प्रविण नांदेडकर, संदीप राजपूत, पंकज डाबी, गणेश राजपूत, पंकज मुसळे आदीं उपस्थित होते.