नंदुरबार l प्रतिनिधी-
घटनाकारांनी विशेष मेहनत करून विविधतेने नटलेल्या भारत देशाला एकसंघ ठेवणारे संविधान निर्माण केले. संविधानातील कायद्याच्या अर्थ लावून ते राबवण्याचे काम न्यायव्यवस्थेवर सोपवण्यात आले आहे, आजही भारतीय नागरिकांच्या न्यायव्यवस्थेवर सर्वाधिक विश्वास असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किशोर संत यांनी केले.
तळोदा येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे होते तर महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे सदस्य अॅड. अमोल सावंत, तळोदा न्यायालयाच्या न्यायाधीश सुविधा पांडे,वकील संघाचे अध्यक्ष रवींद्र वाणी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
फित कापून न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर न्यायाधीश किशोर संत यांनी नूतन इमारतीतील विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली.सुमारे 6 कोटी 20 लाख रुपये खर्चून बांधलेल्या या अत्याधुनिक इमारतीत एकूण 33 कक्ष आहेत. यात साक्षीदार कक्ष (पुरुष व महिला), हिरकणी कक्ष, न्यायदान कक्ष, ग्रंथालय, संगणक कक्ष, फौजदारी व दिवाणी न्यायदान कक्ष, लोकअदालत कक्ष, महिला व पुरुष बार रूम, असुरक्षित साक्षीदार कक्ष पोलीस गार्ड कक्ष,संमेलन कक्ष विधी सेवा प्राधिकरण कक्ष, भोजनालय, शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आपल्या मार्गदर्शनात न्यायाधीश संत यांनी इमारतीचे कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उद्घाटन होत असलेले तळोदा न्यायालयात पहिले न्यायालय असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या नावाची तळोदा शहराचे नाव जोडले गेले आहे, ही गौरवाची बाब आहे. 1952 साली सुरू झाले असून आतापर्यंतच्या ऐतिहासिक वाटचालीचे दस्तऐवजीकरण वकील संघाने करावे. वकील वर्गाची न्यायदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका असून वकिलाचे वर्तन कायम न्यायव्यवस्थेला अभिमान वाटेल असे असावे,त्याला तडा जाऊ न देण्याची आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले आवाहन केले.
जिल्हा सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी सांगितले की, शोषित वंचित घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची आहे सर्वसामान्य घटक डोळ्यासमोर ठेवून न्यायदानाच्या प्रक्रियेचे काम व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.अॅड. अमोल सावंत यांनी वकील संघटनेच्या योगदानाचे कौतुक केले आणि सत्र न्यायालय स्थापनेसाठी प्रयत्न सुरू राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविकात तळोदा वकील संघाचे अध्यक्ष आर.जी.वाणी यांनी तळोदा शहराची व न्यायालयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद केली.
प्रथम महिला न्यायाधीश सुविधा पांडे यांनी आभार प्रदर्शन करत इमारत उभारणीसाठी योगदान देणाऱ्या अभियंते, ठेकेदार, आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. सूत्रसंचालन न्यायमूर्ती सीजीएम ए. ए. यादव अतिरिक्त सीजीएम डॉ.आर. एन. गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाला आर. एन. गायकवाड- दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), पी. आर. फुलारी, एस. एस. बडगुजर, बी. एस. वढाई, ए. के. बनकर, एस. बी. मोरे, व्ही. व्ही. निवघेकर, ए. आर. कुलकर्णी- दिवाणी न्यायाधीश (क. स्तर), एम. बी. पाटील, एस. टी. मलिबे, बी. एन. अरबाड, यु. एन. पाटील, व्ही. एन. मोरे-वरिष्ठ स्तर, ए. ए. यादव-मुख्य न्यायदंडाधिकारी, आर. जी. मलशेट्टी, पी. एम. गुप्ता- जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, एस. आर. पाटील, ए. एस. वानखेडे, पी. एम. काजळे-दिवाणी न्यायाधीश (क. स्तर), माजी मंत्री पद्माकर वळवी, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, उपअभियंता नितीन वसावे, विद्युत अभियंता नितीन इंगळे, यशस्वीतेसाठी वकील संघाचे सचिव ॲड.चंद्रकांत आगळे, कोषाध्यक्ष ॲड. संजय पुराणिक, सहसचिव ॲड. राहुल मगरे, ॲड.किरण बैसाणे, ॲड.संदीप पवार,आदींनी परिश्रम घेतले.
न्यायमूर्तींकडून आदिवासी परंपरेतील स्वागताचे कौतुक
तळोदा येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती किशोर संत यांचे स्वागत कोठार येथील अनंत ज्ञानदीप आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या कलापथकाने पारंपारिक आदिवासी ढोल नृत्य व होळी नृत्याने कऱण्यात आले. याशिवाय नेमसुशील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बहारदार स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. मनोगतात त्यांनी आदिवासी पारंपारिक नृत्याने व स्वागत गीताने केलेल्या स्वागताचे विशेष कौतुक केले. न्यायालयाची इमारत अत्यंत चांगली झाली असून काही दिवस औरंगाबादचे उच्च न्यायालय येथे चालवावे, असा मोह झाल्याचे त्यांनी सांगत कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल देखील त्यांनी कौतुक केले.