नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत पाणलोट विकास घटक 2.0 योजनेअंतर्गत जिल्ह्यांमधील पाणलोट गावांमध्ये पाणलोट यात्रेचे आयोजन व्यापक प्रमाणात करण्यात येणार असून सर्व संबंधित यंत्रणांनी यामध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवावा अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणलोट रथ यात्रा जिल्हास्तरीय समितीची नुकतीच बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत पाणलोट विकास घटक 2.0 योजनेअंतर्गत राज्यातील 140 प्रकल्प क्षेत्रातील 30 जिल्ह्यांमधील पाणलोट गावांमध्ये पाणलोट यात्रा फिरणार असून यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 4 प्रकल्पांचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्यातील मालपूर व नंदपुर, अक्कलकुवा तालुक्यातील हुनाखांब व पांढरमाती, तळोदा तालुक्यातील सावरपडा व धनपुर अक्राणी तालुक्यातील चोंदवाडे खु. व खरवड या 8 गावांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी, डॉ. मित्ताली सेठी यांनी यावेळी, जिल्ह्यात पाणलोट यात्रा येण्याअगोदर करावयाची कामे व पाणलोट यात्रा येण्याच्या दिवशी करावयाची कामे याबाबत आवश्यक ते निर्देश सर्व संबंधित विभागांना दिले. तसेच यामध्ये प्रामुख्याने ग्रामसभा घेणे,
शालेय विद्यार्थीसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धाचे आयोजन करणे, ग्रामसभेच्या दिवशी वृक्षारोपण करणे, नवीन कामांचे भुमिपुजन करणे, झालेल्या कामांचे लोकार्पण करणे, या योजनेविषयी स्थानिक समुदायांमध्ये जागृतता निर्माण करून जनजागृती करण्यासाठी तसेच लोकसहभागातून योजनेच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत फेब्रुवारी 2025 मध्ये पाणलोट यात्रेचे आयोजन व्यापक प्रमाणात करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त लोकसहभाग मिळवावा अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी यावेळी सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.