नंदुरबार l प्रतिनिधी
शनिवार 18 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात 50 लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण केले जाणार असून त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 29 गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात या कार्यक्रमासाठी केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे एस.पी. मगर यांनी दिली आहे.
राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने स्वामित्व (SVAMITVA) योजनेची अमंलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेव्दारे गावातील मिळकत धारकाला मालमत्ता पत्रक (Property Card) उपलब्ध करून देतांना संबधित मिळकत धारकाला दस्तऐवजाचा हक्क (Record Of Rights) प्रदान केला जाणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात स्वामित्व योजनेत नवापुर तालुक्यातील 8, शहादा तालुक्यातील 5 , तळोदा तालुक्यातील 5, अक्कलकुवा तालुक्यातील 6, नंदुरबार तालुक्यातील 5 , असे जिल्ह्यातील एकुण 29 गावांमध्ये सनद वाटप करण्यात येणार आहे. संबंधित गावातील गावातील जास्तीत जास्त नागरीकांनी स्वामित्व योजनेत मालकी हक्काचे सनद प्राप्त करून घेण्याचे आवाहन भूमी अभिलेख विभागाचे एस.पी. मगर यांनी केले आहे.