नंदुरबार l प्रतिनिधी
गोवंश तस्करीसह अंमली पदार्थ व गांजा विक्रीला विरोध केला म्हणून जनजाती समाजाच्या पावरा कुटुंबातील विवाहीतेची निर्घुणपणे हत्या करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मलोणी येथील दिपाली चित्ते या 23 वर्षीय विवाहितेचा चाकूने खून करण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तिच्या आई-वडिलांसह पती व मुलाची मलोणी व लोणखेडा येथे घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यानंतर पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री उईके म्हणाले की, मयत दिपाली हिने आरोपी मुस्लिम कुरेशी करत असलेल्या अवैध धंद्याला व गांजा तस्करी विक्रीला विरोध केला यातून तिचा खून झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. जिल्ह्यात अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री व तस्करी रोखण्याचे आदेश आपण पोलिसांना देत आहोत. तस्करांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच याला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
मंत्री उईके पुढे म्हणाले की, जिल्ह्यात गोवंश तस्करीसह अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या घटना रोखण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले जातील व तस्करांवर कठोर कारवाई केली जाईल. केवळ तस्करीला विरोध केला म्हणून आदिवासी समाजातील विवाहितेला आपला जीव गमावावा लागल्याची घटना अतिशय वाईट आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सखोल माहिती देणार असून संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्याची मागणी करणार आहे. महायुती शासनाच्या काळात जिल्ह्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. मयतेच्या मुलाची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी शासन स्वीकारत असून त्यांना व कुटुंबीयांना अन्य शासकीय योजनांचा लाभ त्वरित दिला जाईल तसेच मुख्यमंत्र्यांमार्फत आर्थिक सहाय्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजेश पाडवी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, डॉ. शशिकांत वाणी, डॉ. किशोर पाटील, तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, विनोद जैन, मोतीलाल जैन, रविद्र राऊळ, अनिल भामरे, कल्पेश पटेल, भाजपा तालुका अध्यक्ष नितिन पाटील, सुनिल चव्हाण, रमाशंकर माळी, महेद्र पटेल, कैलास चौधरी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.