नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्हा प्रशासनाने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान राखण्याचे आवाहन केले आहे. 26 जानेवारी, 1 मे महाराष्ट्र दिन, आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या वेळी राष्ट्रध्वजाचा मान राखणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, सामाजिक अशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, तसेच पोलीस यंत्रणांना राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये विशेषतः प्लास्टिक ध्वजांचा वापर पूर्णपणे टाळण्यावर भर देण्यात आला आहे. नागरिकांनी वैयक्तिक वापरासाठी केवळ कागदी ध्वजाचा वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
*प्लास्टिक ध्वजावर बंदी*
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या निर्देशानुसार प्लास्टिक ध्वजांचा वापर करता येणार नाही. अशा प्रकारचे ध्वज पर्यावरणासाठी घातक असून, त्याचा योग्य प्रकारे नाशही होऊ शकत नाही. यामुळे प्लास्टिक ध्वज विक्रीस बंदी घालण्यात आली आहे, तसेच अशा ध्वजांचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
*राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे आपले कर्तव्य*
राष्ट्रीय समारंभांनंतर राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखला जावा. राष्ट्रध्वज फाटलेला असल्यास तो भारतीय ध्वज संहितेनुसार सन्मानपूर्वक नष्ट करणे आवश्यक आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. तसेच, राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आढळल्यास संबंधित व्यक्तींवर राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 कलम 2 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी कळविले आहे.
*जनतेला आवाहन*
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा-महाविद्यालये, आणि सामाजिक संघटनांना प्लास्टिक ध्वजाचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या या सूचनेचे पालन करत राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
राष्ट्रध्वज ही आपल्या देशाची शान आहे, त्याचा मान राखूनच आपण राष्ट्रीय सण साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.