नंदुरबार l प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नंदुरबार नगरपालिका संचालित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथे सराव करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करुन कौतुक करण्यात आले.
या सागरी स्पर्धेत दर्श शहा याने दोन किलोमीटर अंतरातील स्पर्धेत सहावा क्रमांक मिळविला. स्वराज आव्हाड एक किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत खेळणारा नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात कमी वयाच्या खेळाडू ठरला. निर्मल आरंभी याने दहा किलोमीटर व तीन किलोमीटर, कौस्तुभ गिरणार याने दहा किलोमीटर व तीन किलोमीटर, देव राजपूत याने पाच किलोमीटर, दिप पाटील याने तीन किलोमीटर, आदित्य पिंपळे याने तीन किलोमीटर, पूर्वा गाभणे हिने तीन किलोमीटर, तेजस वाडेकर याने दोन किलोमीटर, संस्कृती माळी हिने दोन किलोमीटर स्पर्धेत सहभागी होवून आपापल्या वयोगटात उत्कृष्ट यश मिळवत नंदुरबार जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घातली आहे.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अमोल भोयर, राहुल काळे, संजय राजपूत, रणजित गावित, अमित गावित यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच हे खेळाडू जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय एक्वा एक्वाथोन स्पर्धेला रवाना होणार आहेत.
जलतरण स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करून कौतुक करण्यात आले. माजी आमदार रघुवंशी यांनी खेळाडूंच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.