अक्कलकुवा l प्रतिनिधी-
तोरणमाळ पर्यटन क्षेत्र व तोरणमाळ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तोरणमाळ येथे विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची तसेच पदाधिकारी व ग्रामस्थांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी हे होते. तर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पराडके, रवि पराडके, पंचायत समितीचे उपसभापती भाईदास अत्रे शिवसेनेचे वरिष्ठ नेते लक्ष्मण वाडिले, ललितकुमार जाट, तुकाराम वळवी, योगेश पाटील, राकेश पावरा, रावेंद्रसिंह चंदेल, प्रा.दिनेश खरात, रोहित मराठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तोरणमाळ परिसरातील ग्रामस्थांनी आमदार आमश्या पाडवी यांच्या समोर विज, रस्ते, शिक्षण, पाणी या बाबत समस्यांचा पाढा वाचला. तर आमदार आमश्या पाडवी यांनी स्वातंत्र्याच्या 76 वर्षां नंतर देखील तोरणमाळ परिसराचा सर्वांगीण विकास झालेला नसल्याने अधिकाऱ्यांनी या परिसराच्या विकासासाठी समन्वय साधत विज, रस्ते यांचा परिपुर्ण आराखडा तयार करुन जनतेच्या समस्या सोडविण्या बाबत सुचना केल्या.
तसेच तोरणमाळ परिसरातील समस्या शासन स्तरावर मांडुन त्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल असे आश्वासन आमदार आमश्या पाडवी यांनी ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषद शिक्षण सभापती गणेश पराडके, विजयसिंह पराडके, प्रा. दिनेश खरात यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीचे प्रास्ताविक वनक्षेत्रपाल एम.बी.चव्हाण यांनी तर सुत्रसंचालन राकेश पावरा यांनी केले.
या बैठकीला वनविभागाचे अधिकारी एम. बी.चव्हाण, विद्युत वितरण कंपनीचे अभियंता तिरुपती पाटील व पावरा, बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. नाईक तसेच ठेकेदार आदीं सह विविध विभाग प्रमुख व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकी नंतर आमदार आमश्या पाडवी यांनी परिसरातील ग्रामिण रुग्णालयात भेट देऊन अडचणी जाणून घेतल्या त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभाग नंदुरबार यांच्या मार्फत सुरु असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल शाळेत भेट देऊन तेथील अडीअडचणी जाणून घेऊन उपलब्ध संसाधनांची माहिती घेतली व तेथील अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले.