नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील विखरण ते सुजालपूर रस्त्यावर ट्रॅक्टरने ॲपेरिक्षाला धडक दिली.या अपघातात महिला ठार तर तिघांना दुखापत झाली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा येथील राजू भट्या पाडवी ॲपेरिक्षाने (क्र.एम.एच.१८, एजे ७०९१) प्रवाशांना बसवून विखरण गावाकडून सुजालपूरकडे जात हाते. यावेळी प्रशांत आत्माराम पाटील (रा.नगाव ता.नंदुरबार) याने त्याच्या ताब्यातील विना नंबरचे ट्रॅक्टर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन विखरण ते सुजालपूर रस्त्यावर भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून ॲपेरिक्षाला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात ॲपेरिक्षामधील ललिताबाई सुनिल ठाकरे (वय ४५, रा.आमलाड ता.तळोदा) या ठार तर राजू पाडवी, सुनिता पाडवी व रक्षा पाडवी यांना गंभीर दुखापत झाली. तसेच ॲपेरिक्षाचेही नुकसान झाले. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत कुंदन सुनिल ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात प्रशांत पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सोनवणे करीत आहेत.








