नंदुरबार l प्रतिनिधी
धर्मादाय रुग्णालयांमधील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालयांची माहिती संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, गरजू नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांमधील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याकरिता विशेष राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षास सहाय्य करण्यासाठी स्थापन केलेल्या धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांचे दालनात संपन्न झाली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे, शहादा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांच्यावतीने दिपक जयस्वाल, डॉ. नरेश पाडवी, वैद्यकीय समाजसेवक चंद्रकांत भोई, डॉ. राकेश पाटील, डॉ. राहुल पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक अविनाश अहिरे, कान्तालक्ष्मी शहा आय धर्मादाय रुग्णालय (होळ तर्फे हवेली) प्रतिनिधी अभिजित खेडकर उपस्थित होते.
यावेळी डॉ. सेठी यांनी आढावा घेतल्यानंतर ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत धर्मादाय रुग्णालय योजनेत कार्यरत रूग्णालय “कान्तालक्ष्मी शहा आय धर्मादाय रुग्णालयाने 1 हजार 133 रुग्णांची निर्धन रुग्ण योजनेतून शस्त्रक्रिया केली आहे. तसेच चिंचपाडा ख्रिचन धर्मादाय रुग्णालय, चिंचपाडा यांनी निर्धन रुग्ण 110 व दुर्बल रुग्ण 351 असे एकूण 461 रूग्णांवर धर्मादाय रुग्णालय योजनेतून उपचार करण्यात आलेले आहेत.
ही दोन्ही रुग्णालय धर्मादाय रुग्णालय योजनेप्रमाणे कामे करत असल्याची माहिती यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयाच्या वतीने सादर करण्यात आली. आरक्षित खाटांबाबत धर्मादाय विभागाच्या www.charity.maharashtra.gov.in सकेतस्थळावर दररोज माहिती अद्ययावत करण्यात येत आहे तसेच रुग्णालयाची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, धर्मादाय रुग्णालय योजनेचा समाजातील गरजू लोकांनी/रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असेही आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी बैठकीत केले आहे.