नंदुरबार l प्रतिनिधी-
परभणी येथील संविधान स्तभांची विटंबना करणाऱ्या व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर शासन करण्याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले.तसेच भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली. याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्यावतीने जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की,परभणी येथे संविधान स्तंभ विटंबना प्रकरणाच्या निषेधार्थ निघालेल्या आंबेडकरवाद भिमसैनिकांच्या मोर्चास काही माथेफिरूंनी हिंसक वळण लावले व परभणी येथे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे काही आंदोलकांना अटक करण्यात आली.
यापैकी एक सोमनाथ सुर्यवंशी या भिमसैनिकाचा पोलिस कोठडीत असतांना संशयास्पद मृत्यू झाला आहे. तरी सोमनाथ सुर्यवंशी याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांची एसआयटी स्थापन करुन उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व चौकशीअंती दोषी आढणाऱ्यांवर कठोर शासन करण्यात यावे.
तसेच सोमनाथ सुर्यवंशी या भिमसैनिकाच्या परिवारास ५० लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळवुन, परिवारातील एका सदस्याला शासकीय सेवेत सामावुन घेण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
या निवेदनात जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, जिल्हा सरचिटणीस राम साळुंखे, युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील,युवक शहराध्यक्ष सचिन पिंपळे, शहराध्यक्ष मोहन पवार, शहर उपाध्यक्ष नरेंद्र बाविस्कर, युवक तालुका अध्यक्ष विजय पानपाटील, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी, युवक जिल्हा सरचिटणीस सुलतान पिंजारी, शहादा युवक तालुकाध्यक्ष दीपक अहिरे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. राहुल शिरसाठ, शहादा तालुका उपाध्यक्ष विनोद समुद्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.