नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून प्रत्येक तालुक्यांसाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करण्यात आल्या असून नुकत्याच 33 ॲम्बुलन्स राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत त्यांचे काल दि.3 डिसेंबर रोजी जि.प.बांधकाम सभापती हेमलता शितोळे यांच्या हस्ते पूजन करून जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून वाटप करण्यात आल्या. या ॲम्बुलन्सचे उद्घाटन नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते झाले होते.
याबाबत हेमलता शितोळे यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागासह विविध ठिकाणी रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून 33 ॲम्बुलन्ससाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला होता. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित तसेच सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून राज्य शासनाकडे मागणी केली होती. तसेच काही तालुक्यांमध्ये ॲम्बुलन्स उपलब्ध व्हाव्यात यासाठी काही तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. यावेळी त्यापुढे म्हणाल्या की, रुग्णांच्या नातेवाईकांना ॲम्बुलन्स तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी दुर्गम भागात विविध ठिकाणी नेटवर्कचा अभाव असल्याने त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटीसाठी देखील राज्य शासनाकडे प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती हेमलता शितोळे यांनी दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांना ॲम्बुलन्सचे वाटप करण्यात आले असून यात अक्कलकुवा तालुक्याला ९, शहादा ९ व नवापूर ४, नंदुरबार, ४, धडगाव ४ आणि तळोदा तालुक्यासाठी २ ॲम्बुलन्स वाटप करण्यात आल्या असून जिल्ह्यात यापूर्वी ६१ ॲम्बुलन्स विविध आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे. दरम्यान ३३ ॲम्बुलन्स वाटपाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती हेमलता शितोळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.