नंदुरबार l प्रतिनिधी-
पंढरपूर येथे होणार्या राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ सहभागी झाला होता. यात नंदुरबार जिल्हा टेनिक्वाईट संघटनेच्या मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. या संघातून कर्णधार मयूर पाटील याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशनच्या मान्यतेने व सोलापूर टेनिक्वाईट असोसिएशनच्यावतीने ४१ वी ज्युनिअर गट राज्य टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पंढरपूर येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचा संघ सहभागी झाला. या संघात मुलांमध्ये मयुर पाटील (कर्णधार), किरण मराठे, हर्षल मराठे, दिव्यांशू मोरे, समाधान माळी, पृथ्वीराज पाटील यांचा समावेश होता. या संघाने उत्कृष्ट खेळाचे कामगिरी करत महाराष्ट्र राज्यात द्वितीय स्थान प्राप्त केले असून या संघातून कर्णधार मयूर पाटील याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
चेन्नई येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत मयूर पाटील महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. खेळाडूंच्या यशाबद्दल नंदुरबार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पंकज पाठक यांनी खेळाडूंना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी डी.आर.हायस्कूलचे पर्यवेक्षक हेमंत खैरनार, विपुल दिवाण, संघटनेचे सचिव डॉ.मयूर ठाकरे, क्रीडाशिक्षक जगदीश बच्छाव, निलेश गावित, स्वप्नील लांबोळे, प्रशिक्षक राकेश चौधरी, पी.एम.पाटील आदी उपस्थित होते.