नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्ह्यातील पशुपालकांनी 21 वी पंचवार्षिक पशुगणना 2024 साठी त्यांच्याकडे असलेल्या पशुधनाची योग्य ती माहिती पशुगणनेसाठी आलेल्या प्रगणकांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उमेश पाटील यानी एका शासकीय प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे.
केंद्र शासनाकडील निर्देशांनुसार महाराष्ट्रात 21 वी पंचवार्षिक पशुगणना-2024 ही 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रूवारी, 2025 या कालावधीत पार पाडण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व कुटुंब, कौटुंबीक उद्योग, बिगर कौटुंबिक उद्योग व संस्था यांना भेटी देण्यात येऊन त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पशुधन, कुक्कुट तसेच कुक्कुटादी पक्षी, मत्स्यपालन व पशुधनासाठी वापरली जाणारी उपकरणे यांची गणना करण्यात येणार आहे.
यामध्ये पशुधन आणि कुक्कुट-कुक्कुटादी पक्ष्यांची त्यांच्या प्रजातीनिहाय माहितीचा समावेश असेल. केंद्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालक व शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढीसाठी विविध कार्यकारी योजनांच्या माध्यमांतून हातभार लावला जात आहे, ज्यामध्ये दुग्धोत्पादनात वाढीसाठी विशेष भर देण्यात येत असून पशुपालकांकडे असलेल्या नवजात, दुधाळ गायी व म्हशी, शेळ्या- मेंढ्यासह अवजड शेतीकामास उपयोगी असणाऱ्या गोधनाची गणना ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागाकडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते, यानुसार शासनाकडून धोरणात्मक योजना आखल्या जातात, निधीची उपलब्धता केली जाते, शिवाय पशुवैद्यकीय चिकित्सालयांच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे, त्यानुसार लसीकरणासाठी लसमात्रांचा व औषधी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांनी त्यांच्याकडे असलेल्या पशुधनाची योग्य ती माहिती पशुगणनेसाठी घरी आलेल्या प्रगणकांना द्यावी.
या पशुगणनेचे कामकाज सर्व दृष्टीने पूर्ण होण्यासाठी व विहीत कालावधीत सर्वोतोपरी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील कामकाजासाठी 102 प्रगणक व 22 पर्यवेक्षकांची तसेच शहरी क्षेत्रातील कामकाजासाठी 14 प्रगणक व 3 पर्यवेक्षक असे एकूण 116 प्रगणक व 25 पर्यवेक्षकांची नेमणूक प्रशासनाकडून करण्यात आली असल्याचे डॉ. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.