नंदुरबार l प्रतिनिधी-
गावित परिवारातल्या सदस्याला काँग्रेसने तिकीट द्यावे ही त्या पक्षाची मर्जी होती मी सांगायला गेलो होतो का? असा प्रश्न करून भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुढे सांगितले की, आमची ती घराणेशाही मग विरोधकांच्या एकाच घरातले तीन तीन सदस्य सत्तेत राहतात तेव्हा ती घराणेशाही नसते का?
गावित परिवारातले सदस्य निवडणुकीला उभे राहतात म्हणून ओरड केली जाते परंतु विरोधकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, आम्ही विकासात्मक काहीतरी करू शकतो हा विश्वास जनतेला असल्याने जनता आमच्या पाठीशी आहे आणि पाठीशी असलेली जनता पाहून वेगवेगळ्या राजकीय पक्ष सुद्धा गावित परिवाराबद्दल विश्वास बाळगून आहेत. विरोधकांनी कधी लोकहिताची कामे केली नाहीत त्यामुळे गावित परिवाराच्या विरोधात ओरड करण्या पलीकडे त्यांच्याकडे काहीच नाही.
मी तीस वर्षात काय विकास केला असा प्रश्न केला जातो. हा प्रश्न करणाऱ्या विरोधकांना तीस वर्षात केलेली विविध कामे जर दिसत नसतील तर हे त्यांचे दुर्दैव आहे. आमच्या विरोधातील नेत्यांनी किती कामे करून दाखवली याची तुलना मतदारांनी अवश्य करावी असेही डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.
भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी आणि रनाळे या दोन ठिकाणी गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री दणदणीत जाहीर सभा पार पडल्या. या जाहीर सभांना संबोधित करताना ते बोलत होते.
तत्पूर्वी जवळपास दहा गावांमधून त्यांनी प्रचार दौरा केला आणि मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधला. दरम्यान जाहीर सभेत बोलताना डॉक्टर विजयकुमार गावित पुढे म्हणाले, मी ज्या वेळेला अनुशेष च्या जागा भरत होतो त्या वेळेला मी ओबीसीच्या जागा भरल्या, वीजीएनटी च्या जागा भरल्या, दलित बांधवांच्या -आदिवासींच्याही जागा भरल्या. 61 हजार लोकांना नोकऱ्या दिल्या. एसटीच्या 36000 व्हिजेंटीच्या 11500 आदिवासींना 28 हजार नोकऱ्या दिल्या. प्रथमच मंत्रिमंडळ त्यानंतरच्या अल्पावधीत हे करू शकलो कारण लोकांसाठी काही करण्याची इच्छा असेल तर सर्व करता येते.
विरोधकांकडे सुद्धा अनेक वर्ष सत्ता पदे होती परंतु त्यांच्याकडे इच्छा नव्हती. मी गरीब कल्याणाची संकल्पना घेऊन राजकारणात आलो. आजही तीच संकल्पना घेऊन विकास कार्य सुरू आहे, असेही नामदार डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले. दरम्यान, नंदुरबार शहरातून आणि ग्रामीण भागातून काढल्या जाणाऱ्या प्रचार फेऱ्या लोकसहभागामुळे खरोखर झंजावाती ठरली.
विविध प्रकारची निवडणूक गीते, जागो जागी फडकणारे भगवे झेंडे, लाडक्या बहिणीं प्रमाणेच युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, त्या त्या भागातील मान्यवरांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह मान्यवरांचे होणारे उत्स्फूर्त स्वागत हे या रॅलीचे मोठे वैशिष्ट्य ठरले. नंदुरबार शहरात भाजपा महायुतीच्या वातावरण निर्मितीने उंची गाठलेली दिसली.