नंदुरबार l प्रतिनिधी-
अक्कलकुवा येथील व्यापाऱ्याला लुटणारे तीन आरोपी ताब्यात घेत 1 लाख 26 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. तसेच गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणारे दोन संशयीत जेरबंद करण्यात आले.स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली.
दि. 6.11 .2024 रोजी 8.15 वाजेच्या सुमारास शुभम दिनेश परदेशी रा. परदेशी गल्ली अक्कलकुवा हे त्यांच्या मोटार सायकलने घरी जात असतांना सोरापाडा ता. अक्कलकुवा येथील स्मशान भुमी जवळ दोन अनोळखी इसमांनी शुभम परदेशी यांना लाकडी काठीने मारहाण करुन त्यांच्याकडे असलेले अडीच लाख बळजबरीने हिसकावुन पळुन गेले म्हणुन अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे भा. न्या. सं. चे कलम 309 (6), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अक्कलकुवा येथे व्यापाऱ्याचे पैसे हे साबीर शेख रा. सोरापाडा व मुस्तकीन खान रा. इंदिरानगर यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने केलेली आहे, त्या अनुषंगाने त्यांनी सदरची माहिती तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून बातमीची खात्री करुन त्याचेविरुध्द् योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या बातमीमधील दोन्ही संशयीत इसमांचा शोध घेतला असता साबीर इसाक शेख रा. सोरापाडा ता. अक्कलकुवा, मुस्तकीन खान अब्दुल शकूर मक्राणी रा. इंदिरा नगर, अक्कलकुवा यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांच्या 4 इतर साथीदारांच्या मदतीने केला असलेबाबत सविस्तर माहिती दिली. त्याप्रमाणे त्यांचा आणखी एक साथीदार संजय राजेंद्र परदेशी रा. सोरापाडा ता. अक्कलकुवा यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून गुन्ह्यातील जबरीने हिसकावून नेलेल्या रोख रक्कमेपैकी 1 लाख 26 हजार रुपये रोख कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आले असून तिन्ही आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्यातील तीन फरार आरोपीतांचा शोध सुरु आहे.
तसेच दिनांक 10/11/2024 रोजी 1 वाजेच्या सुमारास अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील अंकलेश्वर ते बहऱ्हाणपुर महामार्गावर हॉटेल हरि कृष्णा समोर ईश्वर भगतसिंग वसावे, राहुल विजयसिंग वसावे दोन्ही रा. रोजकुंड ता. अ. कुवा जि. नंदुरबार यांचे ताब्यात 25 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी बनावटीचे पिस्तुल, 500 रुपये किमतीचे जिवंत काडतुस व खाली काडतुस मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द् अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भा. ह. का. क. 1959 चे कलम 3 चे उल्लंघन 25 सह महा पो. अधि. का. क. 37 (1) (3) चे उल्लंघन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, अक्कलकुवा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर पोलीस हवालदार मुकेश तावडे, सजन वाघ, पोलीस नाईक मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार यशोदिप ओगले, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील, पोलीस नाईक अजय पवार, पोलीस अंमलदार निशांत गिते यांच्या पथकाने केली आहे.