नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार बनण्याचा मान संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी नुसता पटकावला नाही तर सलग दहा वर्ष या दुर्गम भागात विविध विकास काम करून दाखवल. या दुर्गम भागाला विकासाच्या प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी आणि आपल्या भागाचा कायापालट घडवण्यासाठी त्यांच्या त्या विकास कामांची आठवण ठेवून त्यांना आमदार पदी बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करूया; असे आवाहन अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील कॉर्नर सभांमधून नागेश पाडवी, यशवंत पावरा, सुभाष पावरा, शिवाजी पराडके, प्रताप वळवी आणि प्रमुख वक्त्यांनी केले.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संसद रत्न डॉक्टर हिना गावित या अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील प्रत्येक भागात गाव पाड्यात जाऊन प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर देत आहेत. अनेक ठिकाणी डोंगराळ आणि टेकडी चा भाग पायी चालून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करतात तेव्हा, मोठ्या संख्येने महिलांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होताना पाहायला मिळते. डॉक्टर हिना गावित यांनी खासदार असताना दोन लाख गॅस सिलेंडरचे केलेले वाटप, स्थलांतर करणाऱ्या मजुरांची नोंदणी सुरू करून त्यांना मिळवून दिलेले रोजगाराचे लाभ, दोन लाख बेघर लोकांना मिळवून दिलेले घरे बचत गटातील महिलांना मिळवून दिलेले गृह उद्योग यासह विविध विकास कामांची उजळणी प्रत्येक गावात लोकांकडूनच होत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे त्यांच्या प्रचार फेऱ्यांना वाढता प्रतिसाद आहे.
दरम्यान, कॉर्नर सभांमधील भाषणातून त्यांनी सांगितले की, वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहणारा अक्कलकुवा धडगाव चा दुर्गम भाग प्रगतीच्या प्रमुख प्रवाहात आणायचा असेल तर आपण सर्व मतदारांनी पुन्हा एकदा त्याच विश्वासाने शेगडीच्या चिन्हावर शिक्का मारून मला संधी द्यावी.
आपण सर्व मतदारांनी दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिल्याने नंदुरबार जिल्ह्यातील पहिली महिला खासदार बनवण्याचे सौभाग्य लाभले. त्या दहा वर्षात एक महिला म्हणून या दुर्गम भागातील समस्त महिलांच्या व्यथा, वेदना, समस्या सोडवण्यालाच प्राधान्य दिले आणि अक्कलकुवा धडगाव तालुक्यात विक्रमी स्वरूपात गॅस वाटप केले,
महिलांना लक्षात घेऊनच आरोग्य केंद्र आणि वीज, पाणी संदर्भात उपाययोजना केल्या. रस्ते विकास केला, अस्तंबा आणि सावऱ्या दिगर तोरणमाळ सारख्या दुर्गम भागाला पूल, काँक्रीट रस्ते मिळवून दिले. खासदार असतांना दुर्गम-अतिदुर्गम भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर योजना आणून येथील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.यामुळे विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी जनता संधी देईल, असा विश्वास डॉ.हिना गावित यांनी व्यक्त केला.