नंदुरबार | प्रतिनिधी
घरफोडी व मोटार सायकल चोरी करणार्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखने जेरबंद केले असुन,त्यांच्या ताब्यातुन ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१ ऑक्टोंबर रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास शहादा शहरातील काशिनाथ मार्केटमध्ये श्रीराम मोबाईल दुकानाचे शटर कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी उचकावुन दुकानातील १२ हजार ५०० रु.किं. चा मुद्देमाल चोरुन नेला म्हणून दिपक सुपडु खेडकर रा. द्वारकाधीश नगर, शहादा यांचे फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दि.१३ ऑक्टोंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा येथील काशिनाथ मार्केटमध्ये मोबाईल दुकानात चोरी करणारा संशयीत आरोपी हा म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील कन्साई या गावातील विष्णु ऊर्फ जादु व त्याचे दोन साथीदारांनी मिळुन केलेली आहे अशी बातमी मिळाल्यावरून विष्णु ऊर्फ जादु किसन वळवी यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने किसन गुलाब वळवी, गणेश सुकलाल पटले तिन्ही रा. कंसाई ता शहादा यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्यावरुन त्याच्या ताब्यातुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला ३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला.
तसेच संशयीत आरोपी विष्णु ऊर्फ जादु किसन वळवी यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने नंदुरबार येथुन होंडा ऍक्टीवा व दोंडाईचा जि. धुळे येथुन होंडा शाईन मोटार सायकल चोरी करुन त्याच्या घराच्या पाठीमागे शेतात लपवुन ठेवली असल्याबाबत कळविले.यावेळी दोन्ही मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीतांकडुन ३ हजाराचा एक मोबाईल व ७० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटार सायकल असा एकुण ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असुन तिन्ही आरोपीतांना पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक मोहन ढमढेरे, विजय ढिवरे, दिपक न्हावी, रमेश साळुके, सतिष घुले यांचे पथकाने केली.








