नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेसाठी शेवटच्या दिवशी अखेर 67 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली आहे. दरम्यान महायुती तसेच महाविकास आघाडी यांच्यात मोठी बंडखोरी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
नंदुरबार विधानसभेसाठी एकूण 17 नामांकन दाखल झाले आहेत. भाजपातर्फे डॉक्टर विजयकुमार गावित काँग्रेसतर्फे किरण तडवी यांच्यात प्रमुख सामना होणार आहे. असे असले तरी काँग्रेसच्या उमेदवाराला विरोध करत. उभाठाच्या महिला जिल्हाध्यक्ष रीना पाडवी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ वळवी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे रविंद्र वळवी, समिधा नटावदकर यांनी अर्ज दाखल केल्याने काँग्रेसचे डोकेदुखी वाढणार आहे. या ठिकाणी मनसेचे वासुदेव गांगुर्डे यांनीही अर्ज दाखल केला.
नवापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 19 नामांकन दाखल करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने काँग्रेसतर्फे शिरीषकुमार नाईक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे भरत गावित व अपक्ष शरद गावित आदींनी उमेदवारी केली आहे. या तिघांमध्येच प्रमुख लढत असणार आहे.
मात्र इतर उमेदवारांमुळे तिघांचीही डोकेदुखी वाढू शकते.
शहादा मतदार संघात एकूण 14 अर्ज दाखल करण्यात आले आहे. भाजपातर्फे विद्यमान आमदार राजेश गावित तर काँग्रेसतर्फे राजेंद्र कुमार गावित यांनी उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला विरोध करत. काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे आदींनी नामांकन दाखल केले. त्यामुळे येथे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र बंडखोरीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते.
राज्यातील प्रथम क्रमांकाच्या मतदारसंघ असलेला अक्कलकुवा विधानसभेत आज शिंदे शिवसेनेचे आ.आमश्या पाडवी यांनी उमेदवारी दाखल केली.
काँग्रेसतर्फे ॲड.के.सी. पाडवी यांनी नामांकन दाखल केले आहे. जिल्ह्याचे अक्कलकुवा विधानसभा कडे लक्ष लागून आहे. या ठिकाणाहून भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान आज उभाठाच्या महिला जिल्हाध्यक्ष रीना पाडवी, जिल्हा परिषदेचे सभापती उभाठाचे गणेश पराडके, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे रतन पाडवी, शिंदे शिवसेनेचे किरसिंग वसावे यांनी उमेदवारी दाखल केली. दरम्यान महायुतीतील सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी पक्षातर्फे तसेच अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनीही या मतदारसंघातून भारतीय आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा मतदारसंघात बंडखोरीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. तर अक्कलकुवा मतदारसंघात शिंदे शिवसेनेत व काँग्रेसचे बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली. बंडखोर उमेदवारांना शांत करण्यासाठी नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.