नंदुरबार l प्रतिनिधी-
चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी ते अत्यंत प्रदूषणकारी आहेत त्यावर भारत सरकारने बंदी सुध्दा घातली आहे. घातक अश्या चिनी फटाके आणि देवीदेवता आणि राष्ट्रपुरुष यांचे चित्र असलेली फटाके विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समितीच्या धर्मसेवकांनी जिल्हाधिकारी मिताली सेठी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, भारतात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाक्यांचे प्रमाण वाढले आहे. या फटाक्यांमध्ये घातक अश्या विषारी पदार्थांचे प्रमाण अधिक आहे. ते तयार करण्यासाठी ‘पोटॅशिअम क्लोराईड’ आणि ‘पोटॅशिअम परक्लोराईड’ यांचे रासायनिक मिश्रण वापरले जाते.भारतात या रासायनिक पदार्थांच्या वापरावर बंदी असतांना चिनी बनावटीचे फटाके अवैध मार्गाने देशात येऊन त्याची विक्री होत आहे, तरी त्यावर कारवाई करून त्याच्या विक्रीस प्रशासनाने बंदी आणावी. तसेच विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
तसेच फटाक्यांवर मोठ्या प्रमाणात चित्रांद्वारे हिंदू देवीदेवता आणि राष्ट्रपुरुषांची विटंबना केली जाते ती पूर्णपणे थांबवावी व जे फटाके विक्रेते देवी- देवता यांची चित्रे असलेली फटाके विक्री करतील त्यांच्यावर भा.न्या.सं. कलम २९७, २९८ अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन देतांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, माजी सैनिक अरविंद निकम, पंकज भदाणे, हिंदु सेवा सहाय्य समितीचे जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, उज्वल राजपूत, सुयोग सुर्यवंशी, जयेश भोई, पंकज मुसळे, विनायक राजपूत, पृथ्वीसिंह राजपूत आदी उपस्थित होते.