नंदुरबार l प्रतिनिधी
ग्राम विकासाला आणि स्थानिक रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित हे नेहमीच प्रयत्नशील असतात त्याचाच भाग म्हणून त्यांनी मनरेगातून कामे दिली जावी, यासाठी शासनाकडे आग्रह धरला होता. त्याला यश लाभले असून मनरेगा योजनेतील सुमारे 25 कोटी रुपयांच्या 115 कामांना मंजुरी मिळाली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत बंधार दुरुस्ती, सिमेंट रस्ता करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे याचा समावेश असलेली 25 कोटी रुपयाची ही मंजूर झालेली 115 कामे साक्री तालुक्यातील कासारे, नंदुरबार तालुक्यातील कंढ्रे, मांजरे, कोपर्ली, भादवड, बह्याने, ढेकवद, रनाळे खुर्द, समशेरपुर या गावांना तसेच शहादा तालुक्यातील कोठली, बामखेडा, जयनगर, फेस, डांबरखेडा, हिंगणी या गावातील आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीला हातभार लागणार आहे याच्यापूर्वीच नामदार डॉक्टर गावित यांच्या प्रयत्नांमुळे शेकडो गावांना ठक्कर बाप्पा योजनेतून रस्ते बांधणी आणि काँक्रिटीकरणाचा लाभ झालेला आहे.
मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात मनरेगांतर्गत योजनेत “मागेल त्याला काम” या ऐवजी “मागेल त्याला काम आणि हवे ते काम या उद्देशाने योजना राबविण्याचा शासनाचा मानस लक्षात घेऊन शासनाकडे ही कामे घेण्याचा आग्रह केला होता. त्यास आता मंजुरी मिळाली असून नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील ग्रामविकासाला आणि रोजगार देण्याला यामुळे चालना मिळू शकेल.