मोलगी l प्रतिनिधी-
विजया दशमीनिमित्त काठी (ता.अक्कलकुवा) येथे साजरा होणारा दसरा हा अवघ्या सातपुड्याचा उत्सव आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन व ग्रामस्थ, स्वयंसेवक अश्व शर्यत आयोजकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत उत्सवातील संभाव्य अनुचित प्रकारांवर वचक ठेवण्यासाठी यंदा ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावा अशा सूचना पोलिस प्रशासनाने दिल्या. त्यामुळे महिला-मुलींची छेडछाड व अवैध धंद्यांसह अन्य अवैध प्रकारांवर करडी नजर राहणार आहे.
सातपुड्यात नव्या वर्षातील उत्सवांना काठीच्या दसऱ्यापासूनच खऱ्या अर्थाने सुरुवात होते. त्यामुळे अवघ्या सातपुडा वासियांना काठीच्या दसरा उत्सवाची प्रतीक्षा होती. हा उत्सव तीन दिवसांवर आला असल्याने आदिवासी तयारीला लागला. तर काठीत होणाऱ्या अश्व शर्यतीसाठी महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून घोडेस्वार व मालकांनी देखील अखेरचा सराव करुन घेत आहे. तसे पोलिस प्रशासनही सज्ज असून त्यांनी ग्रामस्थ, स्वयंसेवक अश्व शर्यत आयोजकांची संयुक्त बैठक घेतली.
बैठकीत सह.पोलिस अधीक्षक दर्शन दुगड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, पोलिस उपनिरीक्षक सागर गाडीलोहार, जितेंद्र पाडवी, हवालदार अरुण सैंदाणे, कॉ.राहुल महाले, दिनेश पावरा, सागर पाडवी, सी.के.पाडवी,संजय पाडवी, बहादुरसिंग पाडवी, करणसिंग पाडवी, गणपत सिंग पाडवी, गृहरक्षक कर्मचारी रवींद्र वसावे, रतन पाडवी, अमरसिंग पाडवी ,डॉ.जालमसिंग पाडवी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व वीज वितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्थ अबाधित ठेवा:- पावरा
दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर काठी गावासह परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. परंतु पोलीस प्रशासनाला ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी सहकार्य करणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी काठीसह परिसरात कुठलेही अवैध धंदे व प्रकाराचा अवलंब न करता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे अशी अपेक्षा सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी व्यक्त केली.