नंदुरबार l प्रतिनिधी
समाज प्रबोधन आणि मनोरंजनातून आयुष्यभर समाजिक बांधिलकी जपणाऱ्या साहित्यिक कलावंतांच्या पाठीशी शासन नेहमीच उभे असते. ते यापुढेही राहील अशी ग्वाही आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. ते जिल्हा परिषदेत वृद्ध साहित्यिक व कलावंतांना निवडपत्र वितरणाच्या कार्यक्रमात संबोधित करताना बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, वृद्ध कलावंत मानधन निवड समितीचे जिल्हास्तरीय अध्यक्ष सूपजू बाबा पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पावार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी लालू पावरा आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, कलाकार हे त्यांच्या तारुण्यात विविध कला क्षेत्रात कामगिरी बजावत असतात व राज्यातील नागरिकांचे मनोरंजन करत असतात. परंतु जेव्हा त्यांचे वय होते त्यावेळेस त्यांना नागरिकांचे मनोरंजन करणे शक्य नसते तसेच त्यांना कुठल्याच प्रकारचे भविष्य निधी नसल्यामुळे वृद्ध काळात त्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्यातील वृद्ध कलाकारांच्या या सर्व समस्येचा विचार करून राज्य शासनाने वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजना सन राज्यात सुरु करण्याचा निर्णय घेतला या योजनेअंतर्गत दरवर्षी 100 कलाकारांची निवड करण्यात येते व मानधन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना निर्धारित केलेल्या वर्गवारीनुसार मानधन दिले जाते.
ते पुढे म्हणाले, राज्यातील वृद्ध कलाकारांची त्यांच्या वृद्धोपकाळात हेळसांड होऊ नये, त्यांचा कलाकारांचा आर्थिक विकास करणे,
वृद्ध कलाकारांना दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये,त्यांचे जीवनमान सुधारणे. वृद्धापकाळात त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे, या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.या राज्यस्तरीय योजनेचा लाभ मिळालेल्या कलावंतांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेता येतो, असे सांगून त्यांनी राज्य शासनाच्या सध्या राबवल्या जाणाऱ्या फ्लॅग शिप योजनांची माहिती देवून त्यांनाही लाभ घेण्याचे आवाहन केले.
योजनेची सविस्तर माहिती देवून कलावंतांची कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरागत जायला हवी, ती टाकायला हवी असे यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांनी सांगितले.
यावेळी गेल्या वर्षातील 100 व चालू वर्षातील 100 अशा 200 वृद्ध साहित्यिक व कलावंताना निवडपत्रांचे वितरण करण्यात आले.