नंदुरबार l प्रतिनिधी-
पगार बंद असल्याने एका शिक्षिकेचे शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्यासाठी तब्बल एक लाख दहा हजारांची रक्कमेची लाच मागून त्यातील २० हजाराची लाच स्विकारतांना माध्यमिक शिक्षक तर लाच मागणीप्रकरणी प्राथमिक शिक्षकांसह एक खाजगी पंटर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. याप्रकरणी तिघा संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांची पत्नी शिक्षिका असून त्यांचे नाव शालार्थ प्रणालीत नसल्याने त्यांचा पगार बंद झाला होता. तक्रारदार यांच्या पत्नीचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करून देण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयतील माध्यमिक शिक्षक नरेंद्र राजेंद्र इंद्रजित व अक्कलकुवा येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदीरातील प्राथमिक शिक्षक रोशन भिमराव पाटील या दोघांनी धुळे तालुक्यातील तामसवाडी येथील अरुण भगवान पाटील यांची शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथील अधिकाऱ्यांशी ओळख आहे, ते तुमचे काम करुन देतील, असे तक्रारदार यास सांगितले.
तसेच तुमचे काम करायचे असेल तर तुम्हाला त्यांना एकुण एक लाख १० हजार रुपये द्यावे लागतील व त्यापैकी सुरुवातीला २० हजार रुपयांचे टोकन रक्कम द्यावी लागेल असे सांगत तक्रारदार यांच्याकडून लाचेची मागणी केली.यानंतर तक्रारदार हे खाजगी इसम अरुण भगवान पाटील यांस भेटले असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडुन लाचेची रकमेची मागणी करुन सदर रक्कम शिक्षक नरेंद्र इंद्रजित व रोशन पाटील यांच्याकडे देण्यास सांगितली.
तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी कारवाई केली असता आरोपी शिक्षक असलेल्या दोघांनी तक्रारदार यांच्याकडुन लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत दि.२९ रोजी पंचांसमक्ष केलेल्या यशस्वी सापळा कारवाईदरम्यान नरेंद्र इंद्रजित यांनी तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली आहे. तसेच रोशन पाटील व अरुण पाटील यांनी नरेंद्र इंद्रजित यास तक्रारदार यांच्याकडून लाचेची मागणी करण्यास व मागणी केलेली लाचेची रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
नमूद तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नंदुरबार पोलीस उपधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार,पोहेकॉ.विजय ठाकरे, देवराम गावित, नरेंद्र पाटील, संदीप खंडारे, हेमंत महाले यांच्या पथकाने केली असून त्यांना कार्यवाही मदत पथक पोलीस निरीक्षक नेहा सुर्यवंशी, विलास पाटील, पोना.सुभाष पावरा, पोना.जितेंद्र महाले आदींच्या पथकाने सहकार्य केले.