नंदुरबार l प्रतिनिधी
सध्याच्या काळात क्षेत्र कोणतेही असो तांत्रिकदृष्ट्या साक्षर असल्यास प्रगतीच्या मार्ग सुकर होतो. सामाजिक क्षेत्रातील सेवक, शिवसेनेचे सोशल सैनिक म्हणून तंत्रज्ञानाच्या जास्तीत जास्त वापर करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आपले कार्य आणि विचार पोहोचवण्याची जबाबदारी शिवसैनिकांची असून, विरोधी कमेंटना रोखठोक उत्तर देण्याचे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल यांनी केले.
नंदुरबार येथे आमदार कार्यालयात शिवसेना शिंदे गटाची सोशल सैनिक बैठक घेण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. पुढे सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुल कनाल म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे कार्य यांच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाच्या पुरेपूर वापर करण्याचे त्यांनी सांगितले.
संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दोन आमदार निवडून देण्यात येतील. काळानुसार बदलत्या तंत्रज्ञानाच्या वापर करीत पक्षाच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या अधिकाधिक उपयोग करावा.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, मुख्यमंत्री कार्यालयातील वॉर प्रमुख पांडुरंग पवार, मुंबई लोकसभा मतदार संघातील युवा सेना प्रमुख अक्षय पनवेलकर, युवा सेना सचिव रुपेश पाटील, उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख मयूर मगर, पंचायत समिती सभापती अंजना वसावे, महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत आदी उपस्थित होते.