नंदुरबार l प्रतिनिधी
जीवनात काय करायचे हे तुमच्यापुढे स्पष्ट असले पाहिजे. आपण करायला हाती घेतलेले काम जर चांगलेच आहे, तर पूर्ण आत्मविश्वासाने पुढे चालले पाहिजे. युवक आणि युवतींना हीच ऊर्जा देण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करीत आहे; अशा शब्दात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्याचे कौतुक संसद रत्न डॉ.हिना गावित यांनी केले.
पुणे येथे ‘उन्मेश नवचेतनांचा’ या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत विद्यार्थिनी संमेलनाचा दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी प्रारंभ झाला. त्या प्रसंगी उद्घाटन पर भाषणात डॉक्टर हिना गावित बोलत होत्या. राष्ट्र निर्माण हे जर आपले ध्येय आहे तर सामाजिक कार्याच्या माध्यमातून दुर्लक्षित घटकांना सकारात्मक ऊर्जा देण्याला प्रत्येक युवक युवतीने प्राधान्य दिले पाहिजे. त्यातूनच खरी राष्ट्र उभारणी होऊ शकेल; असेही विचार याप्रसंगी डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केले.
उद्घाटन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून डॉ. हिना गावित माजी खासदार नंदुरबार, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकरपालकर, प्रमुख म्हणून राष्ट्रीय मंत्री अभावीप शालिनी वर्मा, स्वागत समितिचे अध्यक्ष- डॉक्टर स्मिता जाधव, सचिव सौ निवेदिता कछवा, प्रांत उपाध्यक्ष शिल्पा जोशी, प्रांत सहमंत्री श्रेया चंदन व अन्य उपस्थित होते.