नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षकाने नवीन रेशन कार्ड बनवून देण्यासाठी १ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करुन त्यातील ५०० रुपयांचा पहिला हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला गुरुवारी दुपारी रंगेहात अटक केली आहे.
तळोदा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक असलेल्या प्रमोद विश्वासराव डोईफोडे, (४१) याने एकाचे रेशन कार्ड तयार करण्यासाठी १ हजार ५०० रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान तसा अर्ज संबधिताने सादर केल्यानंतर संबंधिताकडून १ हजार रुपयेही घेतले होते. परंतू ५०० रुपये कमी दिल्याने पुरवठा निरीक्षक डोईफोडे याने रेशनकार्ड तयार करुन दिले नव्हते. यातून संबधिताने नंदुरबार लाचलुपचत प्रतिबंधक कार्यालयात संपर्क करुन तक्रार दिली होती.
यातक्रारीची शहनिशा करत एसीबीने गुरुवारी सापळा रचला होता. यावेळी तक्रारदाराने ५०० रुपयांची लाच दिल्यानंतर ती स्विकारताना प्रमोद डोईफोडे याला रंगेहाथ अटक करण्यात आली. याबाबत संशयित प्रमोद विश्वासराव डोईफोडे (४१) याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार विलास पाटील, विजय ठाकरे, देवराम गावित, हेमंत महाले, सुभाष पावरा, नरेंद्र पाटील, संदीप खंडारे, जितेंद्र महाले यांनी केली.