म्हसावद । प्रतिनिधी:
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील आठ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून फरफटत नेल्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील कार्तिक राजेश पाडवी वय ८ वर्ष हा बालक दिनांक १३ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ ते ११:३० वाजेच्या सुमारास चिनोदा शिवारातील शेतामध्ये आपल्या आजोबांसोबत गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेला असता या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मुक्त संचार करीत असलेल्या बिबट्याने या बालकावर हल्ला करून त्याला फरफटत नेल्याने त्याच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या मुलाच्या शोध घेतला असता चिनोदा शिवारातील एका शेतामध्ये या मुलाच्या मृतदेह आढळून आला याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना माहिती कळविण्यात येऊन या बालकाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांच्या मुक्त संचार वाढला असून याबाबत शेत शिवारामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना या बिबट्यांचे नियमित दर्शन घडत असते याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी या बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा तसेच आवश्यक ती उपाययोजना करावी याबाबत मागणी करूनही वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.