नंदुरबार l प्रतिनिधी-
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटत आले तरीही नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे चिंताजनक स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या मा.खा.डॉ.हिना गावित यांनी नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच पुरेसे पर्जन्यमान होऊन पाणीपुरवठा करणारी धरणे पुरेशी भरू दे आणि नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटू दे; अशा अर्थाची भावपूर्ण प्रार्थना डॉ.हिना गावित यांनी ईश्वराकडे केली.
मा.खा.डॉ.हिना गावित यांनी स्वतः केले ड्रायव्हिंग
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मा.खा. डॉ.हिना गावित यांनी विरचक धरणावर जाऊन काल 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी प्रत्यक्ष भेट दिली. पाणीसाठ्याची माहिती घेतली तसेच पर्यायी कोणकोणत्या योजना आणि उपाय तातडीने अमलात आणता येतील याची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन चर्चा केली. विशेष असे की ही पाहणी तातडीने करण्यासाठी डॉक्टर हिना गावित यांनी स्वतः चार चाकी वाहन चालवून धरणापर्यंतचा प्रवास केला. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटत आले तरीही नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे चिंताजनक स्थिती आहे. दरम्यान आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तापी नदीतून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा चालवला आहे.
डॉ. हिना गावित यांनी देखील ही योजना लवकरात लवकर साकार व्हावी यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडील संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा चालू ठेवलेला आहे. ही योजना प्रस्तावित असून त्या संदर्भातील पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असा विश्वास आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे.