नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा अर्ज भरण्यास 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चेतनकुमार ठाकरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
खरीप हंगाम 2024 साठी या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2024 अशी निश्चित करण्यात आली होती. तथापि, शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन शासनाने विमा अर्ज भरण्यास 31 जुलै 2024 अशी मुदतवाढ दिलेली आहे.
याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व एक रुपया भरुन आपल्या पिकाचा विमा घ्यावा. या योजनेसंबंधी काही अडचण असल्यास नजिकच्या कृषि विभाग कार्यालयास संपर्क साधावा, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.