नंदुरबार l प्रतिनिधी
येथील तहसीलदार नितीन गर्जे यांचा मनमानी कारभार व सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी या मागणी करिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
येथील शिवसेना उबाठा पक्षामार्फत तहसीलदार नितीन गर्जे यांच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी निलेश भामरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनातील आशय असा शहर व तालुक्यातील सामान्य नागरिकांसह जबाबदार व्यक्ती व राजकीय प्रतिनिधी गेल्यावर त्यांना व्यवस्थित पद्धतीने वागणूक मिळत नाही कुठलेही काम वेळेत होत नाही. बराच वेळ भेटीसाठी प्रतीक्षा करावी लागते, शहराबाहेरील रस्त्यावरून संध्याकाळी ६ वाजेनंतर वाळू डंपरला बंदी असताना रात्रभर चिरीमिरीच्या व्यवहार करून वाळूचे डंपर सुरू असतात. ज्यांचे साठे लोटे होत नाही त्यांचे डंपर कारवाई करून जमा करण्यात आले आहे. शहर व तालुक्यात वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे यामुळे अनेक अपघात झाले आहेत गेल्या चार महिन्यात अनेकांनी वाळूच्या डंपर मुळे अनेक ठिकाणी प्राणहानी झाली आहे. त्यात गर्भवती महिलांचा तसेच एक पत्रकार यासह अनेकांनी आपला प्राण गमावला आहे.
या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा.
तसेच टेकड्यांवरील गौन खनिज माफियांमार्फत पोखरण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे नुकसान होत आहे. पाताळगंगा नदीत गौण खनिज करून नदीवरील अतिक्रमण करण्याचे चित्र दिसून येत आहे. भूमाफीयांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे यावर तहसीलदार यांच्या वरदस्त असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
तसेच संगणकीय सातबारा उताऱ्यावर काही चूक झाली असल्यास संबंधित तलाठी हे खातेदाराच्या अर्जावरून कलम १५५ खाली ऑनलाइन दुरुस्तीची नोंद टाकतात. त्याची ऑनलाईन मंजुरी तहसीलदार यांच्या मान्यतेने होत असते तसेच भोगवटदार वर्ग-२ या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तावेत नोंदणीसाठी तहसीलदार यांच्या ऑनलाइन मंजुरीची आवश्यकता असते. त्यासाठी देखील टाळाटाळ करण्यात येत आहे. तहसीलदार हे तहसील कार्यालयात सदर विषयी ऑफलाईन अर्ज मागवून तहसीलदार व तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचारी हे खातेदारांकडून मोठ्या प्रमाणावर रकमेची मागणी करतात. ज्यांनी पैसे दिले त्यांचे काम लवकर होते बाकी लोकांचे कामास अडचण निर्माण होत असते.
यासंदर्भात सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास शिवसेना उबाठा पक्षामार्फत १ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. यात पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी होतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील तहसीलदार यांच्या विरोधात कुणाच्या तक्रारी असल्यास त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळील कार्यालयात पंडित माळी यांच्याकडे द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी निवेदनावर जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, सुनील सोनार, महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी, तालुकाप्रमुख रमेश पाटील, शहर महिला आघाडी प्रमुख चेतना माळी, तालुका उपप्रमुख सुनील पवार, ज्येष्ठ शिवसैनिक डॉ हेमंत शर्मा, उपमहा नगर प्रमुख इम्तियाज कुरेशी, शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे, मीडिया प्रमुख राज पाटील, जिल्हा सचिव दिनेश भोये, गटप्रमुख जफर शाह, दिलीप पाटील , उपतालुकाप्रमुख अमृत ठाकरे, महिला उपतालुकाप्रमुख चारु बागुल यांच्या सह्या आहेत.