शहादा l प्रतिनिधी
आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या नंदुरबार तहसिलदार नितीन गर्जे यांच्यावर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सुचना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अरूण चौधरी यांनी मुंबई येथे विरोधी पक्षनेत्यांसह राज्याचे मुख्य सचिव, महसूल यांना निवेदनाद्वारे लेखी तक्रार केली आहे.
शिवसेनेच्या उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,
शिवसेनेच्या वतीने १८ जुलै रोजी सातत्याने होणाऱ्या अतिरेकी कारवाया विरोधात केंद्र शासनाने ठोस भूमिका घ्यावी या मागणीसाठी नंदुरबार तहसिल कार्यालयावर धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी पुर्व सुचना करून ही नंदुरबार तहसिलदार नितीन गर्जे निवेदन स्विकारण्यासाठी उपस्थित राहिले नाही तथा पर्यायी व्यवस्था न करता शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या.
याबाबत नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार प्रा. शरद पाटील, जिल्हा प्रमुख अरूण चौधरी, विधानसभा संपर्क प्रमुख सुनिल पाटील, तळोदा तालुका प्रमुख प्रविण वळवी यांच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेत तहसिलदार नितीन गर्जे यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावर नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सुचना श्री. दानवे यांनी दिल्या आहेत. जिल्हा प्रमुख चौधरी यांनी राज्याचे मुख्य सचिव, महसूल मंत्री यांनाही याबाबतचे निवेदन मंत्रालयात दिले आहे.