नंदुरबार l प्रतिनिधी
गांधीतीर्थ राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धेमध्ये एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार या विद्यालयाला जिल्हास्तरावरचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय आणि सामाजिक स्वच्छतेची जाणीव नवीन पिढीमध्ये रुजावी या उद्देशाने सन 2023 24 या कालावधीसाठी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव व जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय स्वच्छ शाळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये विद्यालयाला जिल्हा स्तरावरचे प्रथम पारितोषिक प्राप्त झालेले आहे सन्मानचिन्ह व रुपये 51 हजार असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 150 पेक्षा जास्त शाळांनी सहभाग घेतला होता त्यातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या व समाजाभिमुख कार्य करणाऱ्या उत्कृष्ट शाळांची निवड या पारितोषिकांसाठी करण्यात आली. दिनांक 20 जुलै 2024 रोजी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव येथे या पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. डॉक्टर अनिल काकोडकर अध्यक्ष गांधी रिसर्च फाउंडेशन तसेच अणु शास्त्रज्ञ, ॲड.नितीन ठाकरे सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक, डॉक्टर सुदर्शन अय्यंगार विश्वस्त गांधी रिसर्च फाउंडेशन तथा माजी कुलगुरू गुजरात विद्यापीठ, तसेच श्री अशोक जैन विश्वस्त गांधी रिसर्च फाउंडेशन तथा अध्यक्ष जैन इरिगेशन यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
विद्यालयाच्या प्राचार्य नूतनवर्षा राजेश वळवी यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमासाठी विद्यालयातील पर्यवेक्षक श्री मीनल वळवी उपशिक्षक किरण पाटील मनीष पाडवी अविनाश सोनेरी हे देखील उपस्थित होते.