नंदुरबार l प्रतिनिधी
पर्यावरणाचा समतोल व पृथ्वीवर मानवी अस्तित्व राखण्यासाठी भूमी, वायू,जल, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांचे संरक्षण करून त्यांचे मानवाकडून होणारे प्रदूषण कमी करणे आवश्यक आहे .यासाठी माझी वसुंधरा अभियान 5.0 ग्रामस्तरावर प्रभावीपणे राबविण्यात यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या याहा मोगी सभागृहात माझी वसुंधरा अभियान 5.0 ची अंमलबजावणी करणेबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शक करताना सावनकुमार बोलत होते. माझी वसुंधरा अभियानाची प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रभावी अंमलबजावणी करावी.पंचायत समिती स्तरावर अधिकाऱ्यांना गाव निहाय जबाबदारी निश्चित करून देण्यात यावी .अभियानाविषयी ग्राम स्तरावर जनजागृती करून ग्रामस्थांना या अभियानात सहभागी करून घ्यावे. अभियानाच्या कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी दिला.
जिल्हास्तरीय कार्यशाळेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रामपंचायत) जयवंत उगले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) कृष्णा राठोड,जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक विवेक गुंड उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार म्हणाले कीए जागतिकीकरणाबरोबर मानवाचे राहणीमान उंचावण्याबरोबरच पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. यामुळे त्याचे दुष्परिणाम मानवाला जाणवू लागले आहेत. भविष्यात मानवजातीचे अस्तित्व भूतलावर राहण्यासाठी भूमी, वायू,जल, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे प्रमोदकुमार पवार यांनी सगितले.
कार्यशाळेत जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक विवेक गुंड यांनी माझी वसुंधरा अभियानात भूमी, वायू,जल, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांचे संरक्षण करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबविणे आवश्यक आहे तसेच त्यासाठी गुणांकन कसे मिळणार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी ,ग्रामपंचायत,शिक्षण व कृषी विभागाचे विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, जिल्हा कक्षातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले.