नंदुरबार l प्रतिनिधी
हरे कृष्ण हरे रामा… जय जगन्नाथ… असा जयघोष करीत इस्कॉन तर्फे आयोजित श्री जगन्नाथ रथ यात्रेला नंदनगरीत अभुतपूर्व प्रतिसाद लाभला. महिला पुरुषांसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे जगन्नाथपुरीला जशी श्री जगन्नाथ रथयात्रा निघते त्याप्रमाणे भारतातील विविध ठिकाणी रथयात्रा काढली जाते, नंदुरबार शहरात देखील गेल्या दोन वर्षांपासून श्री जगन्नाथ रथयात्रा निघत असून यावर्षी दि. 10 जुलै रोजी दुपारी श्री मोठा मारुती मंदिरापासून श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली.
रथयात्रा मार्गावर भाविकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत रांगोळ्या काढून स्वागत करण्यात आले.
रथयात्रेचा प्रारंभ दुपारी मोठा मारुती मंदिर पासून जळका बाजार, सोनार खुंट, गणपती मंदिर, अहिल्याबाई विहीर, द्वारकाधिश मंदिर, हाट दरवाजा, नेहरू पुतळा, नगरपालिका, आमदार कार्यालय, अंधारे चौक मार्गे संजय टाऊन हॉल याठिकाणी सायंकाळी पूर्णाहुती झाली. तद्नंतर संजय टाऊन हॉल सभागृहात सत्संग, नाटिका, नंदनगरीतील भाविक भक्तांनी श्री जगन्नाथ रथयात्रेत रथ ओढून पुण्यप्राप्त केले. आणि सत्संग आणि भोजन- प्रसादाचा लाभ घेतला, आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) नंदुरबार यांनी संयोजन केले.
रथयात्रेची पूर्णाहुती, सत्संग आणि भंडारा प्रसाद संजय टाऊन हॉल याठिकाणी सायंकाळी ७:३० वाजता झाली.