नंदुरबार l प्रतिनिधी
येथील कुमारी नारायणी उमेश मराठे हिने कझाकस्तान येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील ८ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक प्राप्त केले. इतक्या लहान वयात एवढे मोठे यश मिळवणारी नंदुरबार जिल्ह्यातील ही पहिली विद्यार्थिनी आहेच तथापि संपूर्ण खानदेशातील सुद्धा पहिली विद्यार्थीनी असल्याचा दावा केला जात आहे.
नारायणीला माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू सजनदास जोशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. नवव्या मानांकित नारायणीने चुरशीने खेळल्या गेलेल्या अखेरच्या फेरीत दुसऱ्या मानांकित इराणच्या आसेना गोलिझादेला पराभवाचा धक्का देत सुवर्णपदक मिळवले. अंतिम फेरीपूर्वी नारायणी आणि गोलिझादे या दोघीही अपराजित होत्या.
अखेर नारायणीने सात फेऱ्यांसह सहा गुणांसह बाजी मारली. तिच्या या यशाबद्दल शहरासह भारतभरातून शुभेच्छा मिळत आहेत.
नारायणी हिने याच स्पर्धेत रॅपिड आणि क्लासिकल अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून संपूर्ण आशिया खंडात नंदुरबार जिल्ह्याचे आणि भारताचे नाव गौरविले आहे.