म्हसावद। प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पूर्व भागातील घोडले पाडा (चांदसैली) येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील सीआरपीएफ चे वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवान मेजर जवान मेजर रमेश वसावे यांचेवर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात त्यांच्या मूळ गावी घोडलेपाडा येथील एका मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान मुलगा नैतिक याने पार्थिवाला मुखाग्नी दिला.या प्रसंगी शेकडो नागरिकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.यावेळी कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.याप्रसंगी लष्करी जवानांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगूल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली.
राजस्थान अजमेर या ठिकाणी कार्यरत असतांना मेजर रमेश वसावे यांची झारखंड येथे बदली झाल्याने ते अजमेर हुन गावाकडे निघाले असताना सोमवारी दि.१० जून रोजी अपघात झाला होता .त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त कळताच गाव व परिसरातील गावांवर शोककळा पसरली. गाव व परिसर या घटनेने सुन्न झाला आहे.
यावेळी नंदुरबार येथील सैनिक बोर्डचे अधिकारी रामदास पाटील, कल्याण संघटक हरसु बहादुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, प्रांत अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, असलोद पोलिस दुर्क्षेत्राचे हवालदार अशोक कोळी, जितेंद्र इशी , शिसोदे,सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे, विक्की पाटील, सीताराम पवार, अमित पटले, माजी सैनिक तालुका अध्यक्ष संतोष ठाकरे, माजी सैनिक दीपक पवार, माजी सैनिक पांडुरंग पवार, प्रकाश पवार, सरपंच प्रशांत पटले, पोलीस पाटील दशरथ पावरा, तोताराम अहिरे,मेजर भवरसिंग अजमेर, मेजर सुमित बिले, मेजर एम. के. बना, मेजर मुकुल कुमार, जी.डी. इन्सपेक्टर केलजी अनिल दत्ताराम, एस. एस. सूर्यवंशी, बसवरात असवधी, रवी गड्डी, उमेश लकडे, सावंत डी. एस, राणा प्रतापसिंह, हितेश पवार, महेश्वरी हरीश, विविध अधिकारी व पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
शहीद मेजर रमेश वसावे यांचे पार्थिव अजमेर राजस्थान हुन मध्यप्रदेश मार्गे सेंधवा , पानसेमल , खेतिया कडून शहादा पोलिस स्टेशन येथे आणण्यात आले.कार्यालयीन सोपस्कार पार पडल्यावर विशेष वाहनातून घोडलेपाडा येथे पार्थिव आणण्यात आले. शासकीय इतमामात शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली. यावेळी कुटूंबीयांचा आक्रोश पाहुन अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते.आईच्या डोळ्या देखत पतीचा अपघातात मृत्यू त्यानंतर ज्याच्यावर घराची व दोन भावंडांसह एक अविवाहित बहिणीची जबाबदारी होती त्याचा देखील आज मृत्यू झाल्याने आईच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मेजर रमेश वसावे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करी जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली.
मी देखील सैन्य दलात जाणार, दोन्ही मुलांनी व्यक्त केली इच्छा
मेजर रमेश वसावे यांचे दोन मुले आहेत. तन्मय रमेश वसावे (इयत्ता ८ वी ) व नैतिक रमेश वसावे (इयत्ता ६ वी) याने वडिलांना मानवंदना देत असतांना सांगितले की ,माझे वडील देश सेवेत होते ते आज शहीद झालेत. मलाही पुढे सैन्य दलात जाऊन देश सेवा करायची आहे.
सर्व शिक्षण शहादा तालुक्यातच
मेजर रमेश वसावे यांचे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण सुलतानपूर येथील शासकीय आश्रमशाळेत घेतले. त्यानंतर त्यांनी वसंतराव नाईक कॉलेज मध्ये बारावी पर्यंत शिक्षण घेतले. बारावी पास झाल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य दलातील भरती साठी प्रयत्न केला. अखेर त्यांची २००५ साली सीआरपीएफ मध्ये निवड झाली. पहिली नेमणूक जम्मू काश्मीर त्यानंतर दिल्ली चंदीगड झारखंड राजस्थान मधील बिलवाडा याठिकाणी सेवा बजावली. काही दिवसापूर्वी त्यांची झारखंड मध्ये बदली झाली होती.
त्यामुळे त्यांची पत्नी आणि मुले दोन दिवसापूर्वीच आपल्या गावी परतले होते. रमेश वसावे हे आता झारखण्ड मध्ये बदली चे ठिकाणी रूजू होणार होते. त्यासाठी ते गावाकडे निघाले असताना सोमवारी १० जून रोजी दुपारी त्यांचा अपघातात मृत्यू झाला.
शहीद झालेल्या मेजर रमेश वसावे यांच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी एका अपघातात मृत्यू झाला होता. रमेश वसावे हे मोठे असल्याने वयोवृद्ध आई शेवंता बाई लहान दोन भावंडे, तीन बहिणी यांची जबाबदारी येवून गेली. मेजर रमेश वसावे यांना दोन मुले असून मोठा मुलगा तन्मय हा आठवीला नंदूरबार येथे तर दुसरा मुलगा नैतिक हा शहादा येथील विकास हायस्कूल येथे सहावी ला आहे. पत्नी सीता या गृहिणी आहेत. भावाची मुलगी साक्षी हिला त्यांनी दत्तक घेतले होते. ती चौथी चे वर्गात शिकत आहे.या घटनेचे वृत्त कळताच गाव आणि परिसरात येताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला आहे. गाव आणि परिसर सुन्न झाला आहे.