नंदुरबार l प्रतिनिधी
महंमद पैगंबर साहब यांनी देखील सांगितले आहे की, विवाह साध्या व सोप्या पद्धतीने करावा. इतर खर्च करु नये, ही पैगंबर साहेबांची शिकवण आहे. सामुहिक विवाह सोहळ्याने गोरगरीब मुलींचाही उद्धार होतो तसेच अवाजवी खर्च देखील वाचतो, असे प्रतिपादन नंदुरबार शहर जामा मशिदचे पेश इमाम धर्मगुरु मौलवी आदील यांनी केले. ते येथील मुस्लिम समाजाच्या सामुहिक विवाह सोहळा कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जे.के.पार्क, सीएनजी पंपा जवळ, नंदुरबार येथील सामाजिक सभागृहात मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी नंदुरबार शहर जामा मशिदचे पेश इमाम धर्मगुरु मौलवी आदील हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून सिव्हील हॉस्पीटल एनएसओ ऑफीसर डॉ.अंजली अग्रवाल, शिवसेनेचे शहर उपप्रमुख छन्नू शाह पठाण, नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस नासीर इब्राहीम बागवान, नंदुरबार जिल्हा बागवान समाजाचे ज्येष्ठ नेते अब्दुल रशिद शेख चंदू बागवान, मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र मंगा चौधरी आदी उपस्थित होते.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील मुस्लिम समाजातील एकूण पाच जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. विवाह जामा मशिदचे पेश इमाम मौलाना आदिल साहब यांनी मुस्लिम धार्मिक पद्धतीने लावले. तसेच नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी वस्तु भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी सामुहिक दुवा व प्रार्थना करण्यात आली. प्रास्ताविकेत इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान म्हणाले की, सालाबादाप्रमाणे यंदाही गोरगरीब व गरजू सामुदायिक विवाह लावला जातो. तसेच संस्थेतर्फे निकाहनामा व विवाह प्रमाणपत्र देखील देण्यात येते. मागील दहा वर्षापासून इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन व सदा जनसेवा फाऊंडेशनतर्फे मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे.
आतापर्यंत सुमारे १०० च्या वर जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. मुस्लिम समाजातील गोरगरीब व अनाथ मुलांना प्राधान्य देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळ्यात संसारोपयोगी साहित्य देखील देण्यात आले आहे. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावी कार्य करणारे जे.के.पार्क इंटरनॅशनल फाऊंडेशनचे चेअरमन डॉ.किस्मत शेख, सामाजिक कार्यकर्ते हाजी गफ्फार मन्सुरी तसेच खांडबारा येथील अब्दुल कलाम आझाद बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरीफ बागवान यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन संस्थेचे सचिव दानिश बागवान तर आभार रिजवान बागवान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष हाजी असलम चौधरी, संचालक शाकीर बागवान, सैय्यद मकसुद, जमीन खाटीक, सैय्यद मुख्तार, इंजि.अयान शेख, तैय्यब शाह, इरफान खाटीक, जितेंद्र परदेशी, मुजाहिद शेख, मुसद्दीक शिकलीकर, अजिम लोहार, मतीन खाटीक, आवेश मन्सुरी, सुफीयान लोहार, हाशिम मन्सुरी आदींनी परिश्रम घेतले.