शहादा | प्रतिनिधी
संपूर्ण देशात संकरीत व रासायनिक बी बियाण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यामूळे प्रत्येक जण विषारी अन्न प्राशन करीत असल्याने आयुष्यमान कमी झाले. सुदृढ आणि निरोगी आरोग्य ठेवण्याकरीता प्रत्येक शेतकर्याने देशी वाणाचा वापर करावा असे आवाहन पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपरे यांनी केले.येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ येथे आयोजित पुरुषोत्तम पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी आ.राजेश पाडवी, कृऊबाचे चेअरमन सुनिल पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित होते. यंदा पुरुषोत्तम पुरस्कारासाठी संस्थास्तरावर खामगाव जि.बुलढाणाच्या टिळक राष्ट्रीय विद्यालयाची तर व्यक्तिगत पातळीवर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे रा.कोंभाळणे ता.अकोले जि.नगर यांची निवड करण्यात आली आहे.
पुढे बोलतांना बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपरे म्हणाल्या, काळ्या मातीशी नाते जोडल्याने मी इथपर्यंत पोहचली आहे.समाजासाठी काहीतरी करायचे होते.आयुष्यात खुप कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागले. पण मी डगमगली नाही.वडीलांच्या संस्काराने हायब्रीड खाण्याला प्रतिबंध घालत गावठी बी बियाणे तयार करण्यावर भर दिला. माझ्या परिवारापासूनच हायब्रीड खाणे बंद केले. बचत गटापासून मी माझ्या गावठी वाणाच्या उपक्रमास सुरुवात केली. जूनं ते सोनं हे ठेवलेच पाहिजे. जूनं खाणं जर ठेवले तर आरोग्य चांगले राहिल. गावरान खाणारे आजही न थकता कामे करता.आत्ताच्या भाज्यांना चव नाही. आरोग्याला जपायचे असेल तर गावराण खाण्यावर भर दिला पाहिजे. आपण काळया आईला संपविण्याच्या मागे लागलो आहेत. विषारी औषधे टाकून जमिनीची पोत खराब होत आहे.जमिन खराब झाली तर आपण कोणाकडे पाहणार आहोत. त्यासाठी रासायनिक तणनाशके मारु नका. पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्यासाठी मला आता काम करायचे आहे. प्रत्येक गावात देशी वाण तयार करणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी वेगवेगळी पिके घेण्यावर भर दिला पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक गावात देशी वाण लावण्यावर भर दिला आहे. प्रत्येक शेतकर्याने आपल्या घरासमोर एक देशी गाय बांधली पाहिजे. ती आपल्यासाठी लक्ष्मी आहे. मला आजपर्यंत जे पण पुरस्कार मिळाले आहेत ते माझे नाही तर काळ्या आईचे आहेत. विषारी अन्नामूळे आयुष्यमान कमी झाले आहे. यासाठी रान भाज्यांचे संवर्धन केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी आ.राजेश पाडवी म्हणाले, समाजाप्रती योगदान देणारे व्यक्तीमत्व म्हणून स्व.पी.के.अण्णा पाटील यांच्याकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्व.अण्णासाहेब पाटील यांनी शेतकर्यांचा हितासाठी चळवळीत भाग घेवून या परिसरात सहकाराची बीजे रोवली. त्यामुळे या परिसराचा विकास झाला आहे. थांबला तो संपला हे त्यांचे ब्रीद नेहमी उपयोगात येणारे असून याच दृष्टिकोनातून मी कार्य करीत आहे. स्व.अण्णासाहेबांचे कार्य कायम प्रेरणादायी ठरणार आहे.