नंदुरबार l प्रतिनिधी
यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला ५ कोटी रुपयांचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळालेले आहे. त्यातून 1 कोटी 68 लाख रुपयांच्या नफा झालेला आहे. प्रथमस्थानी सर्वसामान्य शेतकरी हित लक्षात घेऊन घेतलेले निर्णय आणि शेतमजूर,संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी तसेच व्यापारी त्यांच्या सहकार्यातून झालेल्या भरभराटी बद्दल शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संचालक मंडळाच्या सत्कार केला.
खानदेशातून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषीमालांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते.मिरची,कांदा,कापूस,धान्य, भाजीपाला खरेदी विक्रीतून बाजार समितीला फायदा झालेला आहे. दि.1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 अखेर 5 कोटी 36 लाख 54 हजार 193 रुपयांचे विक्रमी उत्पादन मिळाले. त्यातून 3 कोटी 67 लाख 86 हजार 763 रुपये खर्च झाला असून,1 कोटी 68 लाख 67 हजार 430 रुपये घसघशीत नफा मिळालेला आहे.
आर्थिक भरभराटी बद्दल शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सभापती विक्रमसिंह वळवी, उपसभापती वर्षा पाटील, सचिव योगेश अमृतकर व संचालक मंडळाच्या आमदार कार्यालयात सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, माझी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,संचालक नवीन बिर्ला, दीपक मराठे,किशोर पाटील,गोपीचंद पवार,लकडू चौरे,गिरीश जैन,ठाणसिंग गिरासे,प्रकाश माळी, विजय माळी,राजेश गावित,गजानन पाटील,दिगंबर जाधव आदी उपस्थित होते.
कांदा,मिरचीतून उत्पन्न
परिसरात कांदा व मिरची अन्य मालांचे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून उत्पादन घेण्यात आल्यामुळे बाजार समितीत दररोज शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत होती. त्याच्या परिणाम म्हणून घसघशीत उत्पन्न मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सुयोग्य नियोजन; शेतकरी हिताचे घेतले निर्णय
मागील काही काळ सोडला तर गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत आमचा गटाची सत्ता आहे. संचालक मंडळाचे सुयोग्य नियोजन,काटकसर शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय व शेतमजूर, हमाल-मापाडी, व्यापाऱ्यांचे अनमोल सहकार्यातून बाजार समितीला ‘अच्छे दिन’ आलेले आहेत.
चंद्रकांत रघुवंशी
शिवसेना नेते (शिंदे गट),माजी आमदार
असे मिळाले उत्पन्न
✓ बाजार फी- 3 कोटी 75 लाख 49 हजार 215.75
✓ भांडवल उत्पन्न- 86 लाख 65 हजार 112.12
✓अनुज्ञप्ती फी- 29 हजार 545
✓ इतर उत्पन्न- 28 लाख 38 हजार 661.48
✓ जनावरे इतर फी- 14 हजार 626.50
✓ गुंतवणुकीवरील उत्पन्न- 45 लाख 47 हजार 63
असा झाला खर्च
✓ एकूण खर्च- 3 कोटी 67 लाख 86 हजार 763
✓ नफा- 1 कोटी 68 लाख 87 हजार 430