नंदुरबार l प्रतिनिधी
देशात लोकसभेची धामधूम सुरू आहे.त्यात विविध घोषणांचा पाऊस पडत आहे.मात्र स्वातंत्र्यानंतर ही सातपुड्यातील दुर्गम भागातील मुलाच्या शिक्षणासाठी शाळा नसल्याने 30 वर्षापासून नर्मदा नवनिर्माण आंदोलनातर्फे अनेक ठिकाणी नागरिकांच्या सहकार्याने नर्मदा जीवन शाळा चालवण्यात येत आहेत. नुकतेच मुसळधार पावसामुळे या शाळांचे मोठे नुकसान झाले असून सुमारे सातशे विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या प्रश्न उपस्थित झाला आहे.
नंदुरबार जिल्हा हा मागास असून जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षीत जिल्हा घोषित केला होता.
नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतर कुपोषण अशा अनेक समस्यांनी घेतला आहे त्यातच सातपुड्यातील दुर्गम भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कुठलीही सोय नसल्याने अनेक गावांमध्ये नर्मदा नवनिर्माण आंदोलनातर्फे याबाबत विविध मागण्या करून ही प्रशासन व शासन याकडे लक्ष देण्याचे गांभीर्य दाखवले नाही त्यामुळे सुमारे 30 वर्षांपूर्वी नर्मदा नवनिर्माण आंदोलनातर्फे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक दुर्गम भागात कुडाच्या, पत्र्याच्या, कौलाच्या झोपड्या बांधून नर्मदा जीवन शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांना शासनाने मान्यता दिली मात्र कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत केली नाही. त्यामुळे या शाळा लोकवर्गणीतून सुरू होत्या याबाबत शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करून ही शासनाने कुठलेही लक्ष दिले नाही. राज्यातील प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्र याच नर्मदा जीवन शाळांमध्ये होते दरम्यान मतदानानंतर सायंकाळी आलेल्या सोसाट्याचा वारा व पावसामुळे मनीबेली, डनेल, थुवानी येथील नर्मदा जीवन शाळांचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने शाळांना सुट्टी असल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र शाळांचे नुकसान झाल्याने या ठिकाणी शिकत असलेल्या 700 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न एरणीवर आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोज सहा तास बोटीने प्रवास करून शिक्षणासाठी दुसरीकडे जाणे या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यामुळे शासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते हा यक्ष प्रश्न आहे.