नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील पहिला लोकसभा मतदारसंघ असलेला नंदुरबार मध्ये मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसुन आला. असून 67.12 टक्के मतदान झाले तर सर्वाधिक नवापूर मतदार संघात 74 टक्के मतदान झाले.
सकाळी 7 वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत 37.33 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतरही भर उन्हात उत्साह दिसून आला. दुपारी चार वाजेपर्यंत त्याच वेगाने मतदान चालू राहिल्याने 49.91 म्हणजे जवळपास 50 टक्के ईतके मतदान पार पडले.नवापूर विधानसभा मतदारसंघात तर चार वाजेच्या आधीच 60 टक्केहून अधिक मतदारांनी हक्क बजावला आहे.
उन्हाची तीव्रता असल्यामुळे बहुसंख्य मतदार बाहेर पडलेले नाहीत. सलग सुट्या असल्यामुळे बाहेर गावी गेलेल्या मतदारांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय वैयक्तिक प्रश्नांवरून राजकीय भूमिका बनवणाऱ्या मतदारांमधील उदासीनता दिसून येते या एकंदरीत परिणामामुळे एकूण मतदान 60 टक्के च्या पुढची पातळी गाठणार नाही असे म्हटले जात होते. तथापि चार वाजेनंतर उन्हाची तीव्रता उतरल्यावर मतदान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. विशिष्ट भागातील विशिष्ट मतदान केंद्रांवरून सकाळपासूनच जोरदार रांगा लागलेल्या दिसल्या. विशिष्ट विचारधारा जपणारा मतदार कृतिशील दिसून आला आणि त्यातूनच देशाचे नेतृत्व निश्चित करणारी ही निवडणूक असल्याचे जाणवून देणारे वातावरण पाहायला मिळाले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर हिना विजयकुमार गावित निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे नवखे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी यांना आव्हान उभे करण्यात यश आले.
दरम्यान, 5 वाजेपर्यंत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात 56.38 म्हणजे 1 लाख 72 हजार 585 मतदारांनी, शहादा विधानसभा मतदारसंघात 63.46 टक्के म्हणजे 2 लाख 16 हजार 337 मतदारांनी, नंदुरबार विधानसभा मतदारसंघात 58.58 म्हणजे 2 लाख 746 मतदारांनी, नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 69.84 टक्के म्हणजे 2 लाख 15 हजार 265 मतदारांनी, साक्री विधानसभा मतदारसंघात 60.30 टक्के म्हणजे 2 लाख 15 हजार 900 मतदारांनी, शिरपूर विधानसभा मतदारसंघात 55.99 टक्के म्हणजे 1 लाख 86 हजार 900 मतदारांनी हक्क बजावला.