नंदुरबार l प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाकडून दाखल असलेल्या तीनही उमेदवारी अर्जांवर भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी हरकत नोंदवली असून त्यावर दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऍड. गोवाल पाडवी यांच्यासह काँग्रेसचे तीनही अर्जधारक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी नंदुरबार लोकसभा मतदार संघातून दखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी झाली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे सर्व अधिकारी अर्ज दाखल करणारे सर्व उमेदवार आणि प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेस पक्षाचे घोषित उमेदवार गोवाल पाडवी, माजी मंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि हेमलता पाडवी या तीनही जणांच्या उमेदवारी अर्जावर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार डॉ.हिना गावित यांनी जोरदार हरकत घेतली. तीनही अर्जदार एकाच परिवारातील असून प्रत्येकाच्या अर्जात या परिवारातील सदस्य नेमके कोणावर अवलंबून आहे याविषयीचे खोटे उल्लेख आढळत असल्यामुळे हे अर्ज नामंजूर करावे, असे म्हणणे डॉ.हिना गावित यांनी मांडले होते.
तथापि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यावर दिलेला निर्णय मान्य नसल्यामुळे काँग्रेस पक्षाकडून दाखल उमेदवारी अर्जांच्या विरोधात न्यायालयातून दाद मागणार आहेत; असे भाजपा उमेदवार डॉ. हिना गावित यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले. यामुळे काँग्रेस पक्षाकडून दाखल झालेली उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.