नंदुरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातील एका आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. कारवाईनंतर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरोधात रोष व्यक्त करत जमावाने घोषणा दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील एका आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पाच लाखांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार याने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असल्याने पथक घटनास्थळी हजर झाले होते.
5 लाखाची मागणी तडजोडीअंती दोन लाखाची रक्कम निश्चित करण्यात येऊन एक लाखाची रक्कम देण्यात आली होती.
24 एप्रिल बुधवार रोजी यातील ५० हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी तक्रारदार हजर झाला यावेळी नाशिक येथील पथक घटनास्थळी हजर झाले होते. तक्रारदाराने पैसे दिल्यानंतर पथकाने पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना रंगेहाथ अटक केली.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या अटकेची माहिती नवापुर येथे माहीत झाल्याने. शेकडोंचा जमाव पोलिस ठाणे परिसरात जमला होता.
यावेळी त्यांच्याकडून ‘पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे हे खोट्या केसेसमध्ये अडकवून छळ करतात’, असे एसीबीच्या पथकाला सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांकडून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कामकाजाचा निषेध करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनस्थळी नंदुरबार येथून पोलीस उपअधीक्षक निलेश तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर आदी अधिकाऱ्यांनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.