नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील लाल बहादूर शास्त्री नगरातील शक्ती हनुमान मंदिरात मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने भव्य पंधरा फूट उंच आणि एक टन वजनाची आकर्षक संगमरवरी हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
शहरातील निझर रस्त्यावरील सीबी गार्डन लगत असलेल्या लालबहादूर शास्त्री नगर परिसरातील जागेवर यापूर्वीच शक्ती महादेव आणि कार्तिक स्वामी यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या जागेवर भव्य दिव्य संगमरवरी हनुमान मूर्ती विराजमान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सीबी गार्डन येथे होणाऱ्या विविध लग्न समारंभप्रसंगी नवरदेवास पार उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण व्हायची. अखेर असंख्य भाविकांच्या आग्रहास्तव सीबी गार्डनच्या जवळ मारुती मंदिर आणि पार आल्याने परिसरातील भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मंगळवार दि.23 एप्रिल रोजी महाबली हनुमान जयंती निमित्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि महाप्रसाद भंडाऱ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिर तसेच कल्याणेश्वर हनुमान मंदिरा प्रमाणेच उंच व देखणी संगमरवरी हनुमानाची मूर्ती सीबी गार्डन जवळ विराजमान करण्यात येत आहे. शनिवारी राजस्थान राज्यातून मूर्ती नंदुरबार शहरात दाखल झाल्यानंतर भाविकांनी मूर्ती पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. मूर्ती प्राण प्रतिष्ठेनंतर महिन्यातील प्रत्येक अमावस्येला भव्य भंडारा आणि अन्नदान कार्यक्रम राबविण्याचा संकल्प शक्तिमान हनुमान मंदिराचे संयोजक वाघोदा येथील माजी पोलीस पाटील सुरेश भोई यांनी व्यक्त केला आहे. सीबी पेट्रोल पंप ते वाघोदा, पातोंडा तसेच विविध नवीन वसाहतीतील भाविकांचे पर्यटन स्थळ ठरू पाहणाऱ्या शक्तिमान हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.