नंदुरबार l प्रतिनिधी
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रघुवंशी समाजाच्या वतीने रक्तदान शिबिरासह शहरातील विविध भागातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेवर ठीकठिकाणी पुष्पृष्टी करण्यात आली.
नंदुरबार शहरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रघुवंशी समाजाच्या वतीने शहरातील विविध भागातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी सकाळी 11 वाजता सजवलेल्या ट्रॅक्टरवरील प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची आरती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी,ज्येष्ठ नेते पृथ्वीराज रघुवंशी,माजी नगरसेवक राजेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात येऊन शोभायात्रेला सुरुवात झाली.
शोभायात्रा परदेशीपुरा,आमदार कार्यालय,जुनी नगरपालिका, नवीन नगरपालिका,डॉ.हेडगेवार मार्ग तेथून पुन्हा आमदार कार्यालय मार्गे परदेशीपुरा परिसरातील श्री राम मंदिरापर्यंत नेण्यात आली. त्याठिकाणी दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
रक्तदानाने सामाजिक बांधिलकी
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रघुवंशी समाजाने रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांसह असंख्य युवक व पुरुषांनी रक्तदान केले. दुपारपर्यंत रक्तदानाच्या उपक्रम सुरू होता.