नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार खा.डॉ. हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरातील भाजपाच्या बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख यांची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील प्रमुख मान्यवर व शेकडोच्या संख्येने बूथ प्रमुख, पन्ना प्रमुखांसह कार्यकर्ते उपस्थित राहिले त्यामुळे एका अर्थाने भाजपा उमेदवार खा.डॉ. हिना गावित यांचे मोठे शक्तिप्रदर्शन घडले.
महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि खा.डॉ. हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरातील इंदिरा भावनांच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकी प्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष श्याम चौधरी, डॉ. विक्रांत मोरे, नगरसेवक आनंद माळी, सदानंद रघुवंशी, मोहन खानवाणी आणि अन्य व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांसह मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुढील कार्याविषयी मार्गदर्शन केले.
खा.डॉ. हिना गावित यांनी या प्रसंगी निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने सूचना करण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला परिश्रम घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. मोदी सरकारच्या माध्यमातून मागील दहा वर्षात झालेले कार्य आणि नुकताच जाहीर करण्यात आलेला जाहीरनामा घराघरापर्यंत पोहोचवून आपली जनकल्याणाची भूमिका लोकांमध्ये ठळक करावी; असे आवाहन केले.